सांगली जिल्ह्यात 17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहीम
सांगली / प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यातील एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्याचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी बुधवारी आरोग्य विभागाला दिले.
येत्या 17 जानेवारी रोजी जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत 18 जानेवारी 2016 नंतर जन्मलेल्या सर्व बालकांची नोंद करण्यात येत आहे. महापालिका आणि ग्रामीण भागात दोन लाख 46 हजार 641 बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 5440 स्वयंसेवकांची नोंदणी करण्यात आली असून 2720 बूथ तयार करण्यात आले आहेत. एकाही बालकाला लसीकरणासाठी त्याच्या पालकांना दोन किलोमीटरपेक्षा जास्त अंतर चालत जावे लागू नये अशी बूथ रचना करण्यात आली आहे.
या मोहिमेच्या तयारीची आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हा शल्य चिकित्सक संजय साळुंखे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मिलिंद मोरे महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉक्टर सुनील अंबोळे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.