आयुक्त नितीन कापडणीस; चोख नियोजनामुळे यश
प्रतिनिधी / सांगली
कोरोना चाचण्यांची वाढवलेली संख्या, राबविण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना यामुळे महापालिका क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी रेट २० टक्क्यावरून ६.३६ टक्क्यापर्यंत खाली आला असल्याची माहिती महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली. दरम्यान नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. विनाकारण बाजारपेठा मध्ये गर्दी करू नये, असे आवाहनही कापडणीस यांनी केले आहे.
कापडणीस म्हणाले, २० दिवसांपूर्वी महापालिका क्षेत्राचा पॉझिटिव्हीटी रेट हा २० टक्क्यांवर पोहचला होता, ही चिंताजनक बाब होती. त्यामुळे तातडीने अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या. परिणामी पॉझिटिव्हीटी रेट ६.३६ इतका खाली आला आहे . यामध्ये आर्टिपीआरचा ७.१७ टक्के तर रॅपिडचा रेट ५.५० वर आला आहे. महापालिका क्षेत्रात प्रतिदिन ६०० ते ८०० कोरोना चाचण्या केल्या जात होत्या. यामध्ये वाढ करण्यात आली. आता प्रतिदिन तीन हजाराच्या आसपास चाचण्या केल्या जात आहेत.
कापडणीस म्हणाले की, गेल्या वीस दिवसात महापालिका क्षेत्रातील बाजारपेठा, झोपडपट्ट्या, दाट लोकवस्तीचे ठिकाणी यावर विशेष लक्ष दिले. या भागातील रहिवाशांच्या सामुदायिक चाचण्या करून कुठे जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आढळतील तिथे विशेष लक्ष केंद्रित केले. पाचपेक्षा अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेल्या ठिकाणी रहिवाशांच्या चाचण्या करून उपाययोजना राबवल्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात महापालिका प्रशासनाला यश आले आहे.