120 किमी प्रति तास वेगाने धावले इंजिन, शेणोली ते ताकाराचीही चाचणी
प्रतिनिधी / मिरज
मिरज-पुणे मार्गावरील रेल्वे विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी मिरज-शेणोली ते शेणोली ताकारी रेल्वे मार्गावर विद्युत इंजिनाची चाचणी घेण्यात आली. 120 किलो मीटर प्रति तास वेगाने हे इंजिन धावले. सध्या मिरज-शेणोली 63.29 किमी आणि शेणोली-ताकारी 16.15 किमी दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
मिरज-पुणे-लोंढा रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणासह दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. यातील बहुतांशी काम अंतिम टप्प्यात आल्याने यापूर्वीही विद्युत इंजिनची चाचणी घेण्यात आली होती. पुणे येथील पुलाचे काम आणि फुरसुंगीपर्यंत दुहेरीकरण पूर्ण झाल्याने सोमवारी विद्युत इंजिनची चाचणी घेण्यात आली. मिरज जंक्शनवर या विद्युत इंजिनची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरज-शेणोली स्टेशन दरम्यान 120 किलो मीटर प्रति तास वेगाने विद्युत इंजिन धावले. दरम्यान, शेणोली ते ताकारी स्टेशन पर्यंत इंजिनाची चाचणी घेण्यात आली. ती यशस्वी झाली आहे.