सभासतींसह सदस्य झाले अचंबित
सातारा / प्रतिनिधी :
शासनाच्या विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करुन ते पंचायत समितीत दिले जातात. परंतु पंचायत समितीत यावर्षी उद्दीष्ठच पूर्ण झाले असल्याचे जेव्हा निदर्शनास आले, तेव्हा मात्र पंचायत समिती सदस्य अवाक झाले. लाभार्थ्यांनी दिलेले प्रस्ताव गायब कसे होतात, याची खातरजमा करण्यासाठी चक्क एका लाभार्थ्याची तक्रार आल्याने खरा प्रकार निदर्शनास आला.
सातारा पंचायत समितीत महिला बाल विकास व समाज कल्याणकडून विविध योजनांचा लाभ देणाऱ्या टेबलवर लोखंडे महिला अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या कामात हलगर्जीपणा दिसून येतो. सातारा तालुक्यात पंचायत समिती सदस्य आपल्या गणातील लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांना प्रस्ताव देतात.
लाभार्थी शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवून कागदपत्रांची फाईल जेव्हा पंचायत समितीत मंजूरीसाठी संबंधित टेबलवर देतात. आपल्याला लाभ मिळेल, आपली फाईल मजूंर होईल, या आशेवर राहतात. मात्र, महिनोन्महिने उलटले तरीही काहीच प्रोसेस झाली नसल्याने पंचायत समिती सदस्यांकडे तक्रार जाते. तेव्हा दोन दिवसांपूर्वी सातारा पंचायत समितीत सभापती सरिता इंदलकर यांच्यासमोर हा प्रश्न मिलिंद कदम यांनी मांडत एका लाभार्थ्यांचा दाखला दिला. तो लाभार्थीही तेथेच असल्याने त्यांनी प्रत्यक्ष प्रस्ताव दिल्याचे सांगितले. त्यावरुन त्यांनी टेबलच्या लोखंडे यांना बोलवून घेतले, त्यांनी प्रस्ताव आला नसल्याचे सांगितले. तर बारनिशीचे मोहिते यांना बोलवून घेतल्यावर खरी माहिती समोर आली. त्यावरुन लोखंडे यांना सक्त ताकिद देण्यात आली.