गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई; शिवसैनिकावरील अन्याय खपवून घेणार नाही
प्रतिनिधी / सांगली
जिथे शिवसेनेची ताकद आहे. तिथली ग्रामपंचायत शर्थीने लढवा, असे आवाहन गृहराज्यमंत्री तथा शिवसेना संपर्कमंत्री शंभूराजे देसाई यांनी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. पक्ष म्हणून निवडणुकीसाठी लागेल ती मदत करू अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिली. दरम्यान राजकारणातून शिवसैनिकाच्यावर अन्याय झाल्यास तो सहन करणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांचा मेळावा राज्यमंत्री देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी आमदार अनिल बाबर, माजी मंत्री अजितराव घोरपडे, संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानूगडे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, संघटक बजरंग पाटील, प्रदीप(काका) माने यांच्यासह सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका प्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.