भाजप उमेदवारी मिळण्याचा विश्वास, पाच वर्षे जनतेकडील नाळ तोडली नाही : कवळेकर
प्रतिनिधी /सांगे
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांच्या पत्नी आणि राज्य भाजप महिला मोर्चा उपाध्यक्षा सावित्री कवळेकर यांनी मंगळवारी सकाळी सांगेचे आराध्य दैवत श्री पाईकदेवाचा आशीर्वाद घेऊन प्रचारकार्याला सुरुवात केली. यावेळी मोठय़ा संख्येने पक्षाचे कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते. विशेष म्हणजे सावित्री कवळेकर आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचा शेला परिधान केला होता.
प्रथम कवळेकर यांनी देवाचे दर्शन घेतले. यावेळी संपूर्ण परिसर भाजपच्या घोषणानी दुमदुमून गेला. यावेळी बोलताना कवळेकर म्हणाल्या की, गेली पाच वर्षे आपण सांगे मतदारसंघात जे कार्य केले आहे त्याची पावती जनता या निवडणुकीत देईल. आज जे जनसमर्थन आपल्याला लाभले आहे, जी स्वतःहून कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली आहे ते पाहता लोकांना सांगेसाठी सावित्री पाहिजे हे दिसून येते. आपण गेली पाच वर्षे जनतेकडील नाळ तोडली नाही. त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे सोडले नाही. सांगे मतदारसंघात लोकांना बदल हवा आहे, असे त्या म्हणाल्या. पक्षाचे राज्य व केंद्रीय नेतृत्व सारासार विचार करून उमेदवारी देईल. आपले आजवरचे कार्य व सद्यस्थिती पाहता भाजपची उमेदवारी आपल्यालाच मिळेल, असा विश्वास कवळेकर यांनी व्यक्त केला.
सांगेसाठी सावित्री कवळेकर हाच पर्याय : नाईक
सांगेसाठी सावित्री कवळेकर हाच पर्याय असल्याचे नवनाथ नाईक यांनी सांगितले. भाजपची उमेदवारी त्यांना निश्चित मिळणार असून आज सावित्री यांच्याबरोबर जे कार्यकर्ते आहेत ते पाहता सांगे मतदारसंघातील भाजपचा मूळ चेहरा दिसून येतो. केवळ प्रचाराच्या वेळी इतकी उपस्थिती लाभते यावरून त्यांना किती पाठिंबा आहे हे लक्षात येते. यावेळी सांगेतून सावित्री यांच्या रूपाने महिला नक्कीच जिंकून आमदार बनणार, असा आशावाद नाईक यांनी बोलून दाखविला.
सावित्री कवळेकर यांनी श्री पाईकदेवाचा आशीर्वाद घेतल्यानंतर श्री रामनाथ देव आणि पीरबाबाचे व नंतर सांगे मिरेकल सायबिणीचे दर्शन घेतले. यानंतर तेमचीवाडा येथून त्यांनी प्रचारकार्याचा शुभारंभ केला. त्यानंतर विष्णुबाग, सद्याबाग, दाबामळ, वेळीपवाडा, मधलावाडा आणि झरीवाडा या भागांतील घरांना भेटी देऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी सांगे भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष नवनाथ नाईक, भाजप मंडळ उपाध्यक्ष सदानंद गावडे, सरचिटणीस सुदेश भंडारी, सचिव प्रशांत नाईक, एसटी मोर्चा अध्यक्ष महेश गावकर, वाडेचे उपसरपंच कुष्टा गावकर, चंदन उनंदकर, पंच मनोज पर्येकर, संदीप मळकर्नेकर, जानो झरो, नगरसेवक मेशू डिकॉस्ता, माजी पंच चंद्रकांत गावकर, उदय गावकर, भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद नाईक, उगेचे माजी सरपंच संतोष गावकर, माजी नगराधक्ष पांडुरंग तारी, अशोक तारी, ऍड. प्रणय कावरेकर, नानू बांडोळकर, मनोदय फडते इत्यादी हजर होते.