प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिकेचे माजी नगरसेवक व वसई विरार महानगरपालिकेचे सेवानिवृत्त असिस्टंट कमिशनर विजयसिंह उथळे (वय 72) यांचे बुधवार दि. 17 रोजी पहाटे अल्पशा आजाराने त्रिपुटी (ता. कोरेगाव जि. सातारा) येथे निधन झाले.
विजसिंह उथळे हे सन 1974 साली अपक्ष म्हणून सातारा नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवडून आले होते. अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहेर काढली, आवाज उठवला, आंदोलने केली. नगरसेवक पदाची त्यांची कारकीर्द गाजली होती. वसई विरार महानगरपालिकेतून प्रदिर्घ सेवेनंतर असिस्टंट कमिशनर म्हणून ते सेवानिवृत्त झाले. शिवाजी उदय मंडळ साताराचे उत्कृष्ठ कबड्डीपटू म्हणुनही त्यांचे नाव होते.
विजयसिंह उथळे हे शिवाजी उदय मंडळ साताराचे संस्थापक बबनराव उथळे यांचे पुतणे आणि राज्यपातळीवरील बुध्दिबळ खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते जयंत उथळे यांचे थोरले बंधू होते.