कराड / प्रतिनिधी :
कराडमधील कार्वे नाका परिसरात ऑलम्पिकवीर स्व.खाशाबा जाधव यांच्या स्मारकाजवळील नगरपरिषदेच्या ओपन स्पेसच्या चारही बाजुंनी संरक्षक भिंत बांधून बंदिस्त करण्याच्या कामाची पाहणी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी केली. या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र करण्याचा मानस नगराध्यक्षांनी व्यक्त केला.
ऑलम्पिकवीर स्व.खाशाबा जाधव स्मारकाजवळ नगरपरिषदेच्या मालकीच्या या मोकळ्या जागेचा योग्य वापर होत नव्हता. यामुळे या परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्षाशी चर्चा करून जागेची योग्य निगा राखली जावी व चांगल्या प्रकारे विकसित करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार नगराध्यक्षा यांनी स्वतः लक्ष घालून हे काम सुरु केले आहे. आज या जागेची पाहणी करून तेथील नागरिक, ठेकेदार यांचेबरोबर चर्चा करून ठेकेदारास आवश्यक त्या सूचना केल्या. तसेच भविष्यामध्ये या ओपन स्पेसमध्ये लॉन लावणे,जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र,लहान मुलांसाठी खेळण्याची व्यवस्था तसेच तरुणांसाठी ओपन जिम असे काही समाज उपयोगी कामे करण्याबद्दल सविस्तर चर्चा झाली.