प्रतिनिधी / वाठार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावातील रुग्णांना गावातच उपचार मिळण्यासाठी धामणेर सारखे आदर्शवत व ऑक्सिजनयुक्त मोफत केअर सेंटर उभारण्याची प्रेरणा इतरांनी घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. ते धामणेर ता. कोरेगाव येथे श्री मारुती देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्यामार्फत मोफत कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह होते.
यावेळी आदर्श सरपंच शहाजी क्षीरसागर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने,अविनाश माने, आनंदराव कणसे, सरपंच संजीवनी सुतार, तहसीलदार रोहिणी शिंदे, बी. डी. ओ. क्रांन्ती बोराटे, सहाय्यक निबंधक संजयकुमार सुद्रीक, मारुती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, कर्नल प्रकाश पवार, प्रदीप क्षीरसागर, सोमनाथ क्षीरसागर, सुरेश ओव्हाळे, सचिन क्षीरसागर, हरिश्चंद्र कणसे, अंजली देशमुख, अशोक देसाई, अंकुश देसाई, शंकर पवार, सुनील क्षीरसागर, डॉ. शिंदे, डॉ. एस एम पाटील, डॉ. प्रवीण केंजळे, सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन , सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले, “कोरोना सेंटरमुळे गावपातळीवरील लोकांच्या मनातील भीती कमी होणार आहे असे दहा बेडचे हे सेंटर असल्यामुळे त्याचा फायदा होणार आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, “धामणेर हे राज्यातील आदर्शवत गौवरलेले गाव आहे राज्यातील इतर जिल्ह्यांत लोकांनी लोकांसाठी केलेला कोरोना सेंटरचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत.
प्रास्ताविकात शहाजी क्षीरसागर म्हणाले, “जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामुळे शनी मारुती देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून ग्रामस्थांचे विचारातून मोफत रुग्णांची सोय करण्यासाठी हे दहा बेडचे सेंटर सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सेंटरमध्ये रूग्णांचे विचार सकारात्मक होण्यासाठी भक्तीसंगीत, टिव्ही. अशा करमणूक व जनरेटर साधनांची सोय करण्यात आली आहे.