दिवसाढवळ्या खून करणारे शार्प शूटर 48 तासांत जेरबंद
प्रतिनिधी/ सातारा
शहरातील नटराज मंदिर परिसरात वाईच्या अर्जुन यादवचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या गुह्याचा तपास करून अवघ्या 48 तासात करून तीन अल्पवयीन आरोपींना जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. यातील मुख्य सुत्रधार अभिजीत उर्फ भैया शिवाजी मोरे (वय 25, रा. गंगापुरी, वाई) याच्यासोबत अर्जुन यांचा वाद झाला होता. या वादात त्याने गोळीबार केला. त्यात अभिजीत जखमी झाला होता. त्याचा राग मनात धरून हा खून करण्यात आलेला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक बन्सल म्हणाले, सन 2020 च्या मे महिन्यात वाई येथे राहत असलेल्या अर्जुन यादव व अभिजीत शिवाजी मोरे यांच्या वाद झाला होता. या वादात अर्जुन याने गोळीबार केला. या गोळीबारात अभिजीत जखमी झाला होता. याचा राग त्याने मनात धरला होता. त्याने तीन अल्पवयीन मुले व स्वतः आणि आणखी एक साथीदार सोमनाथ उर्फ सोन्या शिंदे (रा. रविवार पेठ वाई) यांना सोबत घेऊन कट रचला. हा खून करण्यापूर्वी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. तोच 2 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास नटराज मंदिर परिसरात तो येणार असल्याची माहिती मिळताच हे अल्पवयीन मुले तेथे जाऊन थांबले होते. तो दर्शन घेऊन बाहेर येताच त्यांच्यावर बेछुट दोन गोळ्या झाडण्यात आल्या. डोक्यात आणि पाठीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करत होती. या गुह्यात सहभागी असलेले 3 आरोपी गुन्हा केल्यानंतर पळून गेले होते. परंतु ते वाई शहरात आल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. पथकाने सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे खूनाच्या अनुंषगाने चौकशी केली. यावेळी अभिजीत व सोमनाथ यांच्यासोबत मिळून हा खून केल्याची कबुली दिली. त्यांना पुढील तपासकामी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
दोघांवर गुन्हे दाखल
खून झालेला अर्जुन यादव याच्यावर 307 कलमाअर्तंगत गुन्हा दाखल होता. तसेच अभिजित मोरे याच्यावर पुर्वी तीन गुन्हे दाखल आहेत. तसेच मोक्का अर्तंगत कारवाई ही करण्यात आली होती. दोघे ही गुन्हेगारी विश्वातील आहेत. खूनावेळी दोन पिस्टलचा वापर झाला असा संशय पोलिसांकडून व्यक्त होत आहे. त्या दिशेनेही तपास सुरू आहे. यावर्षी विनापरवाना शस्त्र बाळगणे या गुह्याअर्तंगत 9 कारवाया केल्या आहेत.
आरोपींचा शोधण्याचे श्रेय एपीआय गर्जेना
खूनाच्या तपासाची चक्रे स्थानिक गुन्हे शाखेच्या हाती येताच सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी आपल्या नेटर्वकचा वापर सुरू केला. वाई भागात त्यांना अनेकांकडून गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली. आणि अवघ्या 48 तासांत तीन अल्पवयीन आरोपी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले.
अभासी प्रेमानेच केला घात
अर्जुन हा तडीपार असल्याने तो पुणे येथे वास्तव्यास होता. त्यामुळे तो संशयितांच्या टप्प्यात येत नव्हता. त्यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवली होती. संशयितांनी पुण्यात राहण्यास असलेल्या अर्जुनला इन्स्टाग्रामवर मुलीच्या नावाने खाते उघडून चॅटिंग करत प्रेमाच्या जाळय़ात ओढला. त्यानंतर त्याला साताऱयातील नटराज मंदिर परिसरात भेटण्यास बोलवून त्याचा गेम केला.