नागठाणे / प्रतिनिधी :
शासनाला पाणीपट्टीच्या माध्यमातून दरवर्षी लाखों रुपयांचा महसूल गोळा करून देणाऱ्या बोरगाव (ता.सातारा) येथील कण्हेर पाटबंधारे शाखा क्र.४ व ५ च्या कार्यालयीन इमारतीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यातच भर म्हणजे या कार्यालयाच्या व्हरांड्यातच दारूच्या बाटल्या, रिकामे ग्लास आणि चखण्याच्या पुड्यांचा खच पडला आहे. दोन्ही कार्यालये सुरू असून येथे सदैव कर्मचाऱ्यांचा राबता असूनही याकडे त्यांची डोळेझाक होत असल्याने या दारूच्या बाटल्यांचा खच नक्की कोणामुळे पडतो ? याची खुमासदार चर्चा बोरगावात सुरू आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरगाव गावच्या हद्दीत बोरगाव ते अपशिंगे (मि.) जाणाऱ्या रस्त्यालगत बोरगाव पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावरच कण्हेर पाटबंधारेचे कार्यालय आहे. येथे शाखा क्र.४ व शाखा क्र ५ ही दोन प्रमुख कार्यालये आहेत. या दोन्ही कार्यालयातून कृष्णा, उरमोडी व कण्हेर कालव्याच्या शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याच्या उपश्याची परवानगी दिली जाते. या कार्यालयाशी अंगापूर, वर्णेपासून नागठाणे परिसरातील बहुतांश गावातील जनतेचा रोजचा संबंध येत असतो.या पाणी परवान्याच्या माध्यमातून या दोन्ही कार्यालयाकडून दरवर्षी लाखों रुपयांचा महसूल शासनदरबारी जमा होत असतो.
मात्र, या दोन्ही कार्यालयाच्या इमारतींची सध्या भयानक दुरावस्था झाली आहे. संपूर्ण परिसराला झाडा-झुडपांनी वेढले असून, खिडकांच्या काचाही फुटल्या आहेत. या परिसराला केलेले तार कंपाउंड व इमारतीच्या व्हरांड्याच्या छतासाठी असलेली लाकडे चोरट्यांनी केव्हाच लांबवली आहेत. शाखा क्र.५ च्या इमारतीच्या व्हरांड्यावरच तळीरामांची बैठक बसत असल्याने तेथे अक्षरशः दारूच्या बाटल्यांचा मोठा खच पडला असून यामध्ये प्रामुख्याने नामांकित ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या आढळून येत आहेत.तेथेच दारू पिण्यासाठी वापरलेले प्लास्टिक ग्लास,मिनरल वॉटर बाटल्या व चखण्याच्या पुड्यांचाही ढीग लागला आहे.शासनाच्या महसुलाबरोबरच येथील कर्मचाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात हात ओले होत असल्याची चर्चा या परिसरात होत असून त्यामुळे येथे पडलेल्या दारूच्या बाटल्यांचा खच नेमका कोणाचा? याची जोरदार चर्चा सध्या बोरगाव परिसरात सुरू आहे.