पिकअप-दुचाकीची धडक, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार
परळी / वार्ताहर :
परळी खोऱ्यातील राजापुरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी दुपारी 3 च्या सुमारास दुचाकी आणि पिकअपची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरुन प्रवास करणारे दोन शिक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांना सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
प्रमोद विठ्ठल मुळे (वय 65) व दिगट तात्याबा माने (54) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, परळी खोऱ्यात बहुतांशी रस्ते हे घाट रस्ते आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघाताच्या घटना घडतात. दि. 18 रोजी दुपारी 3 च्या सुमारास राजापुरी, ता. सातारा येथील प्राथमिक शाळेत कार्यरत असलेले मुळे व दिगट माने हे राजापुरीकडून साताऱ्याकडे निघाले होते. बोरणे घाट येथे सवरीचा वाकना या नावाच्या शिवारात कारी गावच्या हद्दीतून घाट रस्त्याने जात असताना समोरुन सज्जनगडकडून येणाऱ्या पिकअप गाडीची व दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मुळे व माने गंभीर जखमी झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून तेथील नागरिकांनी तात्काळ सातारा तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी पोहोचल्यावर जखमींना सायंकाळी सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती.