उंब्रज / प्रतिनिधी :
मारुल हवेली, गमेवाडी येथे मृत बिबट्या आढळल्याची घटना ताजी असतानाच कराड तालुक्यातील इंदोली येथे अंदाजे पाच ते सहा महिन्यांचा बिबट्याचा बछडा कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना शुक्रवारी रात्री निदर्शनास आली. बिबट्या मृतावस्थेत सापडण्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेने नागरिकांमध्ये घाबराट पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी पाटण तालुक्यातील गांधी टेकडीवर असलेल्या शाळेशेजारी मादी बिबट्याचा निमोनियाने मृत्यू झाला होता. तर तीनच दिवसापूर्वी कराड तालुक्यातील गमेवाडी येथे मृत बिबट्या आढळून आला होता. या घटना ताज्या असताना कराड तालुक्यातील इंदोली येथे वन कंपार्टमेंट नंबर 647 याठिकाणी अंदाजे पाच ते सहा महिन्याचे बिबट्याचे पिल्लू कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल ए. पी. गंबरे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व वनकर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाने मृत बछड्याचा पंचनामा व शवविच्छेदन करून त्याचे दहन करण्यात आले.