वाल्मिकी पठारावरील घटना
प्रतिनिधी / ढेबेवाडी
वाल्मिक पठारावर प्लास्टिक बॉम्बच्या साह्याने रानडुकराची व इतर वन्यप्राण्यांची शिकार करणार्या चार जणांना वन विभागाने स्विफ्ट गाडीसह ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवार २९ रोजी मध्यरात्री २.३० च्या दरम्यान सणबुर – रुवले रस्त्यावर पाटीलवाडी नजिक ही कारवाई करण्यात आली.
गत महिनाभरा पासुन विभागात वनवा भडकत आहे. वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डि. डी. बोडके, अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे यांच्या सह वनमजुर रात्र गस्त करत आहेत. सोमवारी मध्यरात्री २.३० च्या दरम्यान गस्त सुरू असताना सणबुर – रुवले रस्त्यावर पाटीलवाडी नजिक वाहनांची तपासणी करत असताना स्विफ्ट कार एम एम एच -०९ डी ए १३७३ अडवून त्याची तपासणी केली असता त्या कारमध्ये रानडुकराचा मांस भाग आढळुन आला.
हे कारवाई करण्यात आलेले चार जण हातकणंगले नवे पारगाव येथील आहेत. राजाराम गिझे (वय३९), गणेश परबते (वय४०), मारुती पवार, तर कारळे (ता. पाटण( येथील तुकाराम साळुंखे (वय ३८) यांना ताब्यात घेतले असून एकजण पसार झाल्याने त्याचा शोध सुरू आहे. शिकार रुवले गावच्या हद्दीत प्लास्टिक बॉम्बच्या साह्याने केली असल्याचे आरोपींनी कबूली दिली असुन त्यांच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ कलम ९,३९,४४(१) व ५१ अन्वये गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल विलास काळे, वनपाल सुभाष राऊत, डि डी बोडके, वनरक्षक अमृत पन्हाळे, जयवंत बेंद्रे करत आहेत.