सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शब-ए-मेराज व शब-ए-बारात उत्सव अत्यंत साधेपणाने व शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे तसेच सामाजिक अंतराचे पालन करुन साजरा करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये शब-ए-मेराज (चंद्रदर्शनावर अवलंबून) उत्सव दि. 11 मार्च रोजी 0.00 वा. पासून ते दि. 12 मार्च रोजीच्या 24.00 वा. या कालावधीत व शब-ए-बारात (चंद्रदर्शनावर अवलंबून) उत्सव दि. 28 मार्च रोजीच्या 0.00 वा. पासून ते दि. 29 मार्च रोजीच्या 24.00 वा. या कालावधीत पुढील आदेश जारी केले आहेत.
शब-ए-मेराज व शब-ए-बारात सर्व मुस्लीम धर्मीय बांधव आपाआपल्या विभागातील मशिदीत रात्रभर नमाज, कुराण व दुवा पठण करतात. त्यामुळे बहुसंख्य मुस्लीम वस्तीत रात्रभर मुस्लीम बांधवांची वर्दळ असते. तसेच काही ठिकाणी वाझ या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. कोविड-19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षी दि. 11 मार्च रोजीची रात्री व दि. 12 मार्च रोजीची पहाट या कालावधीत शब-ए-मेराज (चंद्रदर्शनावर अवलंबून) व दि. 28 मार्च रोजीची रात्र व दि. 29 मार्च रोजीची पहाट या कालावधीत (चंद्रदर्शनावर अवलंबून) येणाऱ्या शब-ए-बारात या उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुकांचे आयोजन न करता मशिदीत अथवा घरात दुवा पठण करावी.
स्थानिक मशिदीत नमजा पठणाकरीता येणाऱ्या मुस्लीम बांधवांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता एकावेळी 40 ते 50 व्यक्तिंनी टप्प्या-टप्प्याने सामाजिक अंतराचे पालन व मास्कचा वापर करुन दुवा पठण करावे. मशिदीतील व्यवस्थापक यांनी आजूबाजूच्या परिसरात निर्जंतुकीकरणाची व्यवस्था, सामाजिक अंतराच्या व स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इ. ) चे पालन होईल याकडे लक्ष द्यावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.