मंदिराबाहेर प्रसादाची दुकानं, भजन, कीर्तनाचा कार्यक्रम
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरात आषाढी एकादशीनिमित्ताने विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. सकाळपासून विठ्ठल गवई मंदिर, जुने ऐतिहासिक मंदिरात रांगा लावल्या होत्या. उपवासाचा शाबू वडा खाण्यासाठी उपवासकऱयांनी हॉटेल मध्ये गर्दी केलेली होती. मंदिरात भजन, कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढीच्या शुभेच्छा देत मोठया उत्साहात आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान, सातारा शहरातील शाळांमध्येही विद्यार्थ्यांना एकादशीनिमित्ताने दिंडय़ा काढल्या होत्या.
आषाढी एकादशीनिमित्ताने सातारा शहरात विठ्ठल गवई मंदिरात भाविकांनी गर्दी सकाळपासून केली होती. गवई यांच्याकडून मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिरात भजन, कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याने वातावरण उत्साहीत भक्तीमय बनले होते. मंदिराबाहेर नारळ व प्रसादाची दुकाने लागली होती. तसेच गोलमारुती मंदिरासमोरील पुरातन विठ्ठल मंदिरातही भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, अनेकांचे उपवास असल्याने शहरातील खिचडी स्पेशालिस्ट प्रकाश टोपे यांच्या हॉटेलमध्ये अक्षरशः झुंबड उडाली होती. तसेच इतर हॉटेलमध्येही उपवासाच्या पदार्थाची मागणी वाढली होती.