वृत्तसंस्था/ दुबई
भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा व तिची झेक प्रजासत्ताकची साथीदार लुसी ऱहॅडेका यांनी दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली.
सानिया-लुसी यांनी जागतिक 12 व्या मानांकित डेमी स्कूर्स (नेदलँड्स) व चॅन हाओ चिंग (चिनी तैपेई) या जोडीवर 7-6 (7-3), 5-7, 11-9 अशी संघर्षपूर्ण मात केली. विजयी जोडीने प्रतिस्पर्ध्यावर लवकर ब्रेक मिळवित 3-1 अशी आघाडी घेतली. पण डेमी-चॅन जोडीने जोरदार मुसंडी मारत हा सेट टायब्रेकवर नेला आणि टायब्रेकरमध्ये सानिया-लुसी यांनी संयम राखत हा सेट जिंकला. दुसऱया सेटमध्ये डेमी-चॅन यांनीही जोरदार लढत देत सेट जिंकून बरोबरी साधली आणि सामना सुपरटायब्रेकरवर नेला. सुपरटायब्रेकरमध्ये वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या सानिया-लुसी यांनी बाजी मारत सेटसह सामना जिंकून आगेकूच केली. त्यांची पुढील लढत जपानची शुको अवोयामा व सर्बियाची अलेक्सांड्रा प्रुनिक यांच्याशी होणार आहे. अवोयामा-प्रुनिक जोडीने चौथ्या मानांकित गॅब्रिऐला डाब्रोवस्की (कॅनडा) व गुलियाना ओल्मॉस (मेक्सिको) यांच्यावर 7-6 (7-5), 2-6, 10-5 अशी मात केली.