वार्ताहर / कांदोळी
केंद्र सरकारकडून देशभरात राबविण्यात येत असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला (टिका उत्सव) साळगाव मतदारसंघातील साळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
काल मंगळवार दि. 13 रोजी सकाळपासून सुरू झालेल्या या मोहिमेत साळगाव पंचायत क्षेत्रातील कोरोना टिका उत्सवात 48 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. या उपक्रमास साळगाव पंचायतीमध्ये नागरिकांनी खूपच गर्दी केली होती. यावेळी वेळीअभावी काही नागरिक लसीकरण करण्यास वंचित राहिल्याने स्थानिक पातळीवर या उपक्रमाची आणखी एकदिवस गरज होती असे मत श्री परुळेकर यांनी व्यक्त केले. सकाळी 9 वा. लसीकरणास सुरुवात करण्यात आली. या लसीकरणाचे आयोजन साळगाव पंचायत सभागृहात करण्यात आले होते.
यावेळी साळागव पंचायतीचे सरपंच लाफिरा रेमिडीयस, उपसरपंच व इतर पंच सदस्य, कांदोळी आरोग्य केंद्राचे डॉ. नाझारेथ साळगाव भाजप कार्यकर्ते व केंद्राच्या अन्य कर्मचाऱयांनी आपले लसीकरणास योगदान दिले. यावेळेस गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे, माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर व प्रमुख भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या गोव्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्यासाठी प्रत्येकाने लसीकरणाच्या गैरसमजूती पासून दूर राहून लसीकरण करून घ्यावे असे आवाहन गोवा प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी केले आहे.