11 आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिकाही : जिल्हा रुग्णालयात कार्डियाक रुग्णवाहिकेला मंजुरी – पालकमंत्री उदय सामंत
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिल्हा नियोजनच्या निधीतून जिल्हय़ासाठी आणखी एक स्वॅब टेस्ट मशीन मंजूर करण्यात आली आहे. तसेच अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका, चार ठिकाणी ऑपरेशन थिएटर, जिल्हा रुग्णालयाला कार्डियाक रुग्णवाहिका मंजूर करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून कोविड व आरोग्यावर खर्च करायच्या निधीबाबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आमदार वैभव नाईक, संदेश पारकर, अतुल रावराणे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, विकास कुडाळकर उपस्थित होते.
सिंधुदुर्गात कोरोना नियंत्रणात आहे. संपूर्ण राज्यात आपला जिल्हा पहिल्या दोन क्रमांकात आहे. तरीही कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यासाठी 16 लाखाच्या आणखी एक स्वॅब टेस्ट मशीन खरेदीला मंजुरी देण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयासह वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालय, कणकवली उपजिल्हा रुग्णालय, कुडाळ महिला रुग्णालय या चार ठिकाणी ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आली. त्यासाठी 1 कोटी 45 लाखाचा निधीही मंजूर केला आहे, असे ते म्हणाले.
अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका मंजूर करण्यात असून त्यात दोडामार्ग तालुक्मयातील मोरगाव, सावंतवाडी तालुक्यातील बांदा, आंबोली, मालवण तालुक्यातील हिवाळे, मसुरे, कुडाळ तालुक्यातील माणगाव, वेंगुर्ले तालुक्यातील आडेली, तुळस, कणकवली तालुक्यातील खारेपाटण, फोंडा, देवगड तालुक्यातील फणसगाव या आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्यासाठी 1 कोटी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याशिवाय जिल्हा रुग्णालयासाठी कार्डियाक रुग्णवाहिकाही मंजूर करण्यात आल्याचे सामंत म्हणाले.
वेंगुर्ल्यात उद्यानासाठी सव्वादोन कोटी
जिल्हा नियोजनमधून सर्व नगर पंचायतींना छोटय़ा फायर ब्रिगेडच्या गाडय़ा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच कणकवली येथील भालचंद्र महाराज मठासाठी 50 लाख, श्रीधर नाईक स्मृती उद्यानासाठी 75 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वेंगुर्ल्यात उद्यानासाठी 2 कोटी 25 लाख, प्राथमिक शाळांना शुद्ध पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी 2 कोटी मंजूर करण्यात आले आहेत, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सिंधुदुर्गात 22 हजार 233 जणांना लस
जिल्हय़ात आतापर्यंत 22 हजार 233 जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली. त्यामध्ये चार लोकांना दुसरी लस देण्यात आली. जिल्हय़ात कोरोना नियंत्रणात असून सद्यस्थितीत 146 कोरोना रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत 70 हजार 648 चाचण्या झाल्या असून 94.77 रिकव्हरी रेट आहे, तर 2.7 मृत्यू दर आहे, अशी माहिती देण्यात आली.