मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे प्रतिपादन : सिद्धगिरी मठ येथे संत संमेलनाचे उद्घाटन
वार्ताहर /कणेरी/माणकापूर
सिद्धगिरी हा देशातील आदर्श मठ आहे. येथे प. पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या माध्यमातून आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, आर्थिक क्रांतीचे कार्य घडल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले. ते सिद्धगिरी महासंस्थान मठ कणेरी येथे आयोजित संत संमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन करून बोलत होते.
कणेरी सिद्धगिरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, शिरोळ सिद्धारूढ मठाचे प.पू. शंकरुढ स्वामीजी, अथणी गुरुसेवाश्रम मठाचे प.पू.आत्माराम स्वामीजी, बंजार गुरुपीठाचे प.पू. बाबूसिंग महाराज आदी स्वामीजींच्या दिव्य सानिध्यात मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, भाजपचे प्रधान कार्यदर्शी बी. एल. संतोष, केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी, मंत्री शशिकला जोल्ले आदी मान्यवरांच्या हस्ते रोपास पाणी घालून संत संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कर्नाटक भवन बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी बी. एल. संतोष होते.
कणेरीप्रमाणेच कर्नाटकात मठ उभारा
मुख्यमंत्री बोम्माई म्हणाले, भारत हा संस्कार आणि संस्कृतीचा देश आहे. येथे भक्तीनेच क्रांती झाली आहे. बुद्ध, बसव, शंकराचार्य आदी संतांची देण या भूमीस लाभली आहे. सत्य, न्याय, धर्म आपल्या जगण्यात यायला हवेत. कणेरी मठाच्या माध्यमातून भक्ती, सद्भाव आणि प्रेम वाढविण्याचे काम होत आहे. येथील कार्याची दखल घेऊन कर्नाटक भक्तभवन बांधण्यासाठी यापूर्वी 3 कोटी रुपये दिले आहेत. आणखी 2 कोटीची तरतूद करत आहोत. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी कणेरी मठाप्रमाणेच कर्नाटकातही मठ उभारावा. त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य करू, असे आश्वासन मुख्यमंत्री बोम्माई यांनी दिले. बी. एल. संतोष यांनी, धर्माचे रक्षण करणे स्वामीजींची, आपणा सर्वांची जबाबदारी आहे. येथील कुटुंब, मठ आणि मंदिर परंपरा भारतीय शिव संस्कृती टिकून राहिल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, महात्मा बसवेश्वरांचा कर्म हीच पूजा हा संदेश प.पू. अदृश काडसिद्धेश्वर स्वामीजींनी प्रत्यक्ष कृतीतून जगून दाखविला आहे. त्यांनी येथे राबविलेले विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत.
मंत्री शशिकला जोल्ले यांनी सर्व स्वामीजी, मान्यवर व भक्तांचे स्वागत करून कणेरीमठ येथे कर्नाटक भवनासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले. प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजींनी प्रास्ताविक केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते कर्नाटक भवन बांधकामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी कर्नाटकचे पायाभूत विकास मंत्री व्ही. सोमण्णा, पाटबंधारे मंत्री गोविंद कारजोळ, खासदार अण्णासाहेब जोल्ले, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. के. सुधाकर, आमदार श्रीमंत पाटील, माजी मंत्री शशिकांत नाईक यांच्यासह कर्नाटक-महाराष्ट्रातील विविध मठांचे मठाधीश, मान्यवर, नेतेमंडळी व हजारो भाविक उपस्थित होते. महाराष्ट्राचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आभार मानले.