यूटीएस ऍपद्वारे करता येते बुकिंग : तिकीट बुकिंग काऊंटरवरचा भार होणार कमी
प्रतिनिधी /बेळगाव
अनारक्षित रेल्वे प्रवासासाठी आता रेल्वेस्थानकातील बुकिंग काऊंटरवर तासन्तास थांबण्याची आवश्यकता नाही. भारतीय रेल्वेच्या यूटीएस ऍपवरून अनारक्षित रेल्वेचे घरबसल्या क्षणार्धात बुकिंग करता येते. तसेच प्लॅटफॉर्म तिकीटही मिळत असल्याने बेळगावमध्ये अनेक प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत.
भारतीय रेल्वे आता डिजिटल होत आहे. तिकीट बुकिंग ऑनलाईन केल्याने नागरिकांना घरबसल्या सेवा उपलब्ध होत आहेत. यामुळे प्रवाशांचा वेळ व पैसा यांची बचत होत आहे. एक्स्प्रेससोबतच आता अनारक्षित रेल्वेसाठीही ऑनलाईन बुकिंग करणे शक्मय होत आहे. रेल्वेने तयार केलेल्या युटीएस ऍपवरून बुकिंग करता येते. हे बुकिंग केवळ जवळच्या प्रवासासाठी व अनारक्षित एक्स्प्रेससाठी ठेवण्यात आले आहे. पेपरलेस व तिकिटाचा पर्याय प्रवाशांना निवडता येतो.
मिरज ते हुबळी दरम्यान अनारक्षित एक्स्प्रेस धावत असल्याने प्रवाशांची संख्या वाढत आहे. तिकीट काढण्यासाठी रेल्वेस्थानकातील काऊंटरवर गर्दी होत आहे. बऱयाचवेळा रांगा लावून तिकीट खरेदी करावे लागते. यासाठी भारतीय रेल्वेने ‘यूटीएस’ ऍपचा अवलंब करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे तिकीट बुकिंग काऊंटरवरचा भार कमी होणार आहे.
असे वापरा यूटीएस ऍप
मोबाईलमधील प्ले स्टोअरमधून यूटीएस ऍप डाऊनलोड करावे. त्यानंतर नॉर्मल तिकीट अथवा प्लॅटफॉर्म तिकीट येथे क्लिक करून गावांची नावे निवडायची आहेत. वयस्क किती व लहान मुले किती याची नोंद करावी. पेमेंट टाईपमध्ये डेबिट कार्ड अथवा युपीआय निवड केल्यानंतर तिकिटाचा दर स्क्रिनवर दिसतो. लॉग ईन केलेले नसेल तर रजिस्टर ऑप्शनमध्ये जावून मोबाईल क्रमांक, पूर्ण नाव, पासवर्ड व जन्म तारीख नोंद करून ओटीपी देऊन रजिस्टर करता येते.