केएससीए 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त केएससीए धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए चषक 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सीसीआय बेळगावने तानाजी स्पोर्ट्स क्लब हुबळीचा 249 धावांनी तर बीडीके स्पोर्ट्स फौंडेशन हुबळी संघाने इंडियन बॉईज बेळगावचा 8 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. जीत गदीया व प्रभजन बी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बेळगाव, ऑटोनगर येथील केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सीसीआय बेळगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.2 षटकात 9 गडी बाद 212 धावा केल्या. त्यात जीत गदीयाने 2 षटकार, 12 चौकारांसह 82, साईनाथ चौगुलेने 3 चौकारांसह 33, अनिश सोनवालकर व राजदीप मोटारने 4 चौकारांसह प्रत्येकी 31, आकाश मोराबाद व ध्रुव म्हेत्री यांनी प्रत्येकी 25 धावा केल्या. तानाजी स्पोर्ट्स हुबळीतर्फे अभिषेक बालगीने 39 धावात 3, रक्षीत कित्तुरने 52 धावात 3 तर राहुल पवार, प्रेम दांदीन व प्रकाश मादार यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना तानाजी स्पोर्ट्स क्लब हुबळी संघाचा डाव 22.3 षटकात 63 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज सीसीआयच्या गोलंदाजीपुढे दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. त्यात शुभम खोतने 4 धावात 4 तर जीत गदीयाने 12 धावात 4 तर अनिश सोनवालकरने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात इंडियन बॉईज बेळगावने प्रथम फलंदाजी करताना 16.4 षटकात सर्व गडी बाद 65 धावा केल्या. त्यात शंकर नारीने 2 चौकारांसह 19 , वेदांत एम. ने 3 चौकारांसह 17 धावा केल्या. बीडीके हुबळीतर्फे प्रबजन बी. ने 22 धावात 3, सौरभ एस. ने 5 धावात 2, अथर्व नुलीने 9 धावात 2 तर दीपक एन. ने 20 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बी. डी. के हुबळीने 11.3 षटकात 2 गडी बाद 66 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात ए. बी. सामीने 7 चौकारांसह 36 तर आकाश कुलकर्णीने 13 धावा केल्या. इंडियन बॉईजतर्फे आर्सलिन जे. व मुजादलायत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.