बेळगाव प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
अर्जुन स्पोर्ट्स क्लब आयोजित बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात साई इंडियन बॉईज संघाने तनय स्पोर्टींगचा 8 गड्यांनी, के. आर. शेट्टीने एवायएम अनगोळचा 9 गड्यांनी तर एसआरएस हिंदुस्थानने सरकार स्पोर्ट्स गांधीनगरचा 8 गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. तनिष्क नाईक, रोहित पाटील, मदन बेळगावकर यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
एसकेई जुबली मैदानावर सुरु असलेल्या बेळगाव प्रिमियर लिग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत शनिवार खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात तनय स्पोर्टींग संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 41 धावा केल्या. त्यात अंजारने 3 चौकारांसह 21 धावा केल्या. साई इंडियन बॉईजतर्फे विशाल दळवीने 4 धावात 2, पवन शिंदेने 11 धावात 2, तनिष्क नाईकने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई इंडियन बॉईज संघाने 6.2 षटकात 2 गडी बाद 42 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात तनिष्क नाईकने 3 चौकारांसह 27 धावा केल्या. तनय स्पोर्टींगतर्फे परशुराम पाटीलने 9 धावात 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात एवायएम अनगोळने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 44 धावा केल्या. त्यात आकाश असलकरने 2 चौकारांसह 15, साकिब अ•sवालेने 1 चौकारासह 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे करण बोकडेने 12 धावात 3, मदन बेळगावकर व विशाल गौरगौंडा यांनी प्रत्येकी 8 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना के. आर. शेट्टी संघाने 5 षटकात 1 गडी बाद 45 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात मदन बेळगावकर 3 षटकार, 2 चौकारांसह 14 चेंडूत आक्रमक 31 धावा केल्या. एवायएमतर्फे आकाश हसलकरने 1 गडी बाद केला.
तिसऱ्या सामन्यता सरकार स्पोर्ट्स गांधीनगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 7 गडी बाद 47 धावा केल्या. त्यात विनायक शाहूने 2 चौकारांसह 10 तर रवी पिल्लेने 8 धावा केल्या. एसआरएस हिंदुस्थानतर्फे फयाज सिद्दीकेने 7 धावात 2, मुशाईद नालबंदने 12 धावात 2, मिलिंद बेळगावकर 14 धावात 2 तर रोहित पाटीलने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना एसआरएस हिंदुस्थानने 5.1 षटकात 2 गडी बाद 48 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात रोहित पाटीलने 1 षटकार, 3 चौकारांसह नाबाद 27 धावा केल्या. सरकार गांधीनगरतर्फे रवी पिल्लेने 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे ज्येष्ठ क्रिकेटपटू शिवाजी जाधव, विनय कुलकर्णी, अमृत खाडे, एसकेई सोसायटीचे सभासद ज्ञानेश्वर कलगटगी, विवेक पाटील, डॉ. रामकृष्ण एन., प्रा. परसू गावडे यांच्या हस्ते सामनावीर तनिष्क नाईक, मदन बेळगावकर, रोहित पाटील तर इम्पॅक्ट खेळाडू करण बोकडे, विशाल दळवी, मुशाहिद नालबंद यांना चषक देऊन गौरविण्यात आले.