केजरीवाल अन् जैन धमकी देत असल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
200 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या सुकेश चंद्रशेखरने दिल्लीचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मंत्री सत्येंद्र जैन आपला मानसिक छळ करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याचा दावा त्याने पत्रात केला आहे. आप नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांच्या विरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी त्रास दिला जात असल्याचे सुकेशने म्हटले आहे. 31 डिसेंबर रोजी जैन यांनी तुरुंग महासंचालकांच्या माध्यमातून पुरावे त्यांच्या हाती सोपविण्याची आणि आरोप मागे घेण्याची ऑफर दिली होती. याच्या बदल्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीत एका मतदारसंघाची उमेदवारी आणि पंजाबमध्ये वाळू उपसा कंत्राटाची ऑफर मिळाली होती. ही ऑफर मान्य न केल्यास दुसऱया तुरुंगात हलविण्यात येईल. तसेच अनन्वित छळ करत आत्महत्या करण्यास भाग पाडले जाईल अशी धमकी जैन यांनी दिली असल्याचे सुकेशने पत्रात म्हटले आहे.