100 हून अधिक देशांमध्ये सुडोकूला मिळवून दिली लोकप्रियता
जगातील 100 हून अधिक देशांमध्ये 20 कोटींपेक्षा अधिक लोकांच्या पसंतीचे पझल असलेल्या सुडोकूचे ‘गॉडफादर’ म्हटले जाणाऱया माकी काजी यांचे वयाच्या 69 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले आहे. काजी यांची कंपनी निकोलीन त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. सुडोकूचा आविष्कार स्वीस गणितज्ञ लियोनहार्ड यूलर यांनी 18 व्या शतकात केला होता. पण सुडोकूला लोकप्रिय करण्याचे काम काजी यांनी केले होते.
1980 मध्ये काजी यांनी सुडोकूला स्वतःच्या नियतकालिकात स्थान दिले. लोकांची याला मोठी पसंती मिळाल्याने याचा डिजिटल अवतार आणावा लागला होता. 2006 पासून तर दरवर्षी सुडोकूची जागतिक स्पर्धा आयोजित केली जाऊ लागली. या स्पर्धांमध्ये काजी यांनाही आमंत्रित केले जात होते.
1951 मध्ये सेपोरो येथे जन्मलेल्या काजी यांनी हायस्कुलनंतर कियो विद्यापीठात प्रवेश घेतला होता. पण 1970 मध्ये जपान-अमेरिका सुरक्षा कराराच्या विरोधामुळे अनेक वर्ग बंद पडले. काजी यांना शिक्षण सोडावे लागले आणि ते एका प्रिंटिंग कंपनीशी जोडले गेले. एका दरम्यान एका अमेरिकन नियतकालिकात नंबर गेमयुक्त क्रॉसवर्डवर त्यांची नजर गेली होती.
1980 मध्ये त्यांनी मित्रांसोबत मिळून जपानचे पहिले पझल मॅगझीन ‘पझल सुशिन निकोली’ सुरू केले. यातच ‘अंकांनी एकटे रहावे’ या शीर्षकासह त्यांनी कोडं सुरू केले होते. याचे संक्षिप्त नाव ‘सुडोकू’ जबरदस्त लोकप्रिय झाले. 1983 मध्ये त्यांनी निकोली कंपनी स्थापन केली. त्यांच्या कंपनीने एका मागोमाग पझल बुक प्रकाशित करण्यास प्रारंभ केला. यामुळे जपानच्या बुक स्टोअर्समध्ये पझल कॉर्नर दिसू लागले. 2004 मध्ये ब्रिटिश वंशीय एका प्रशंसकाने जपान दौऱयादरम्यान हे पाहिले आणि ‘द टाईम्स’ वृत्तपत्रात सुडोकूला स्थान मिळवून दिले.