वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑक्टेबरमध्ये होणाऱया थॉमस व उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला असून भारताला बऱयापैकी ड्रॉ मिळाला आहे. डेन्मार्कमधील आर्हस येथे ही स्पर्धा 9 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.
भारताच्या पुरुष संघाला गट क मध्ये स्थान देण्यात आले असून याच गटात विद्यमान चॅम्पियन चीन, नेदरलँड्स व ताहिती या संघांचाही समावेश आहे. महिला संघाला गट ब मध्ये स्थान मिळाले असून विद्यमान उपविजेते थायलंड, स्पेन, स्कॉटलंड यांचाही याच गटात समावेश आहे. कौलालंपूर येथे बीडब्ल्यूएफने याचा ड्रॉ आयोजित केला होता. प्राथमिक फेरीच्या अखेरीस प्रत्येक गटात पहिले दोन क्रमांक मिळविणाऱया संघांना बाद फेरीत स्थान मिळेल.
2018 मध्ये झालेल्या मागील आवृत्तीत भारताच्या पुरुष व महिला संघाला बाद फेरी गाठण्यात अपयश आले होते. 2016 मधील उबेर चषकमध्ये भारतीय महिलांना चॅम्पियन चीनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. याशिवाय 2014 मध्ये नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेतही भारतीय महिलांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. यजमान डेन्मार्कने 2016 मध्ये थॉमस चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांचा यावेळी गट ब या आव्हानात्मक गटात समावेश झाला आहे. याच गटात कोरिया, फ्रान्स, जर्मनी यांचाही समावेश आहे. इंडोनेशियाने विक्रमी 13 वेळा थॉमस चषक स्पर्धा जिंकली असून त्यांच्या अ गटात चिनी तैपेई, अल्जेरिया, थायलंड यांचा समावेश आहे तर मागील उपविजेते जपानला मलेशिया, कॅनडा व इंग्लंड यांच्यासह ड गटात स्थान मिळाले आहे.
उबेर चषकमध्ये विद्यमान विजेते जपान गट अ मध्ये असून इंडोनेशिया, जर्मनी, फ्रान्सही याच गटात आहेत. गट क मध्ये कोरिया, चिनी तैपेई, ताहिती व इजिप्त यांचा समावेश आहे. चीनने 14 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र गेल्या वेळी त्यांना 1980 नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले होते. यावेळी त्यांना ड गटात डेन्मार्क, मलेशिया, कॅनडा यांच्यासह स्थान मिळाले आहे.
ही स्पर्धा आधीच्या नियोजनाप्रमाणे गेल्या वर्षी 16-24 मे या कालावधीत होणार होती. पण ती लांबणीवर टाकून 15-23 ऑगस्ट या कालावधीत घेण्याचे ठरविण्यात आले होते. पण कोरोना महामारीच्या कारणास्तव ती पुन्हा ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली आणि इंडोनेशिया, द.कोरिया, थायलंड, चिनी तैपेई या अव्वल संघांनी माघारीचा निर्णय घेतल्यानंतर मागील वर्षीच्या सप्टेंबरमध्ये पुन्हा ती लांबणीवर टाकण्यात आली होती.