आयपीयू अध्यक्ष भारताच्या दौऱयावर – पोर्तुगाल या प्रक्रियेत भारतासोबत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंटर पार्लमेंट्री युनियन (आयपीयू)चे अध्यक्ष दुआरते पशेको यांनी मंगळवारी भारतीय संसदेच्या केंद्रीय कक्षात खासदारांना संबोधित केले आहे. या संबोधनावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्य म्हणून सामील केले जावे. पोर्तुगाल या प्रक्रियेत भारताला समर्थन देत असल्याचे पशेको यांनी सांगितले आहे.
कोरोना संकटाच्या काळात भारताने स्वतःच्या देशवासीयांना मदत केली. तसेच लसीसह अन्य सामग्रीच्या स्वरुपात अनेक देशांना सहाय्य केले आहे. याप्रकरणी भारताचे मी आभार मानतो. आयपीयू अध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान भारतीय संसदेच्या समर्थनाचे वैयक्तिक स्वरुपात आभार मानण्यासाठी भारतात आल्याचे उद्गार पशेको यांनी काढले आहेत.
ओम बिर्लांकडून स्वागत
भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. भारताने नेहमीच विस्तारवाद आणि जागतिक दहशतवादाच्या विरोधातील स्वतःचे विचार स्पष्टपणे मांडले आहेत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षांच्या कालावधीत भारतातील लोकशाहीवादी परंपरा अधिकच मजबूत झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकीनंतर सत्तेचे सहज हस्तांतरण आमच्या लोकशाहीवादी प्रतिबद्धता दर्शवित असल्याचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पशेको यांचे स्वागत करताना म्हटले आहे.
7 दिवसांच्या दौऱयावर
आयपीयूचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले दुआरते पशेको हे पोर्तुगालचे खासदार आहेत. पशेको हे 7 दिवसांच्या भारत दौऱयानिमित्त 15 मार्च रोजी दिल्लीत दाखल झाले होते. 130 वर्षांपेक्षा अधिक जुन्या असलेल्या या संघाचे भारताने दोनवेळा अध्यक्षत्व पार पाडले आहे.