अन्यथा शासन हस्तक्षेप करेल! : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱयांकडून सेंट लुक्स हॉस्पिटलची पाहणी : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्याचे संचालकांना सूचना
वार्ताहर / वेंगुर्ले:
पालकमंत्री उदय सामंत यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी येथील बंद अवस्थेत असलेल्या सेंट लुक्स हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी मे महिन्यापर्यंत ओपीडी सुरू करणार असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद आहे. पण अद्यापपर्यंत हॉस्पिटलमध्ये ओपीडी सुरू न झाल्यामुळे पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी पालकमंत्र्यांनी सेंट लुक्स हॉस्पिटलच्या संचालकांशी मोबाईलवरून थेट संपर्कसाधून हॉस्पिटल सुरू करण्यासंदर्भात अहवाल मंगळवारपर्यंत जिल्हाधिकाऱयांना पाठवावा. तसेच आपल्या अडचणी जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून मार्गी लावाव्यात व तातडीने प्राथमिक स्तरावर हॉस्पिटलमध्ये निदान ओपीडी सुरू करावी, अशा सूचना सामंत यांनी संचालकांना दिल्या.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 व आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार शहरातील बंद असलेले सेंट लुक्स हॉस्पिटल शासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष सुनील डुबळे यांनी पालकमंत्री उदय सामंत व जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे केली होती. त्यानुसार पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सेंट लुक्स हॉस्पिटल येथे भेट देऊन स्थानिक पदाधिकारी रमेश वाघमारे व रेवरंट महेश चोपडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, सावंतवाडी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी वैभव साबळे, मंडल अधिकारी एस. व्ही. जाधव, पोलीस निरीक्षक तानाजी मोरे, शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख आबा कोंडसकर, सुनील डुबळे, सचिन देसाई, सचिन वालावलकर, तालुकाप्रमुख यशवंत परब, व्यापारी संघाचे अध्यक्ष विवेक खानोलकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, आनंद बटा, सुनील वालावलकर, सेन्ट लुक्स हॉस्पिटलचे स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.
समस्या मांडण्याच्या सूचना!
यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांनी हॉस्पिटलचे स्थानिक पदाधिकाऱयांशी चर्चा करून वस्तुस्थितीची माहिती घेतली. सदर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी वर्षाची मुदत न्यायालयाने हॉस्पिटल प्रशासनास दिल्याचे स्थानिक पदाधिकाऱयांनी सांगितले. सदर हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तातडीने काही आरोग्य सुविधा सुरू करण्यासंदर्भांतील निर्णय कोल्हापूर येथील हॉस्पिटलचे संचालक यांचा असल्याचे हॉस्पिटलच्या स्थानिक पदाधिकाऱयांनी सांगितले. यावेळी सामंत यांनी कोल्हापूर येथील संचालकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. हॉस्पिटल सुरू करण्यासाठी असलेल्या समस्या जिल्हाधिकारी यांच्याशी मंगळवारी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून त्या मार्गी लावाव्यात, अशा सूचना केल्या.
अन्यथा हॉस्पिटल ताब्यात घेणार!
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण हॉस्पिटल वर्षाच्या कालावधीत सुरू करू झाल्यास नाईलाजाने शासनाला हॉस्पिटल ताब्यात घ्यावे लागेल. हॉस्पिटल सुरू करण्यास आर्थिक अडचणी अथवा कोणत्याही अडचणी असल्यास आम्हाला सांगाव्यात. शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी उभे राहून नागरिकांना लवकरात लवकर आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असेही सामंत यांनी सांगितले. चर्च कौंन्सिलच्या ताब्यात असलेल्या गोहीन मेमोरियल हॉलचीही दुरावस्था झाल्याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी खेद व्यक्त केला. सदर हॉलसाठी डिपीटिसीमधून निधी देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.