गोकाक फॉल्सवरील घटना
प्रतिनिधी /बेळगाव
महात्मा गांधी जयंती दिनी सुटी असल्यामुळे गोकाकचा धबधबा पहायला गेलेला एक तरुण सेल्फी काढताना पाय घसरून तब्बल 140 फूट दरीत पडूनही तो आश्चर्यकारकरीत्या बचावला. केवळ दैव बलवत्तर म्हणून किरकोळ जखमांवर निभावले.
प्रदीप सागर (वय 28) मूळचा राहणार गुलबर्गा, सध्या रा. बेळगाव असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर गोकाक येथील खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. गोकाकचे सामाजिक कार्यकर्ते आयुब खान यांच्या मदतीने पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रदीपला दरीतून सुखरुप बाहेर काढले.
उपलब्ध माहितीनुसार प्रदीप हा बेळगाव येथील एका बँकेचा कर्मचारी आहे. शनिवारी महात्मा गांधीजयंतीनिमित्त सुटी असल्यामुळे आपल्या काही मित्रांसमवेत तो गोकाकचा धबधबा पाहण्यासाठी गेला होता. सायंकाळी सेल्फी काढताना पाय घसरून थेट दरीत कोसळला. त्याच्या मित्रांनी ही गोष्ट गोकाक पोलिसांना कळविली.
गोकाक शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरुणाचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अंधारामुळे शोध मोहीम थांबविण्यात आली होती. प्रदीपच्या मित्रांनी सातत्याने त्याला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मोबाईलची रिंग वाजत होती. मात्र, पलीकडून कसलाच प्रतिसाद मिळत नव्हता.
दुसऱया दिवशी रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दरीत पडलेला प्रदीप शुद्धीवर आला. त्याने तातडीने आपल्या मित्रांशी मोबाईलवर संपर्क साधला. आपण जिवंत असल्याचे त्यांना सांगितले. त्यामुळे मित्रांनी पुन्हा गोकाक पोलिसांना त्याची माहिती दिली. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मदतीने त्याला सकाळी दरीतून बाहेर काढण्यात आले.
केवळ दैव बलवत्तर म्हणून…
गोकाक फॉल्स परिसरात पाय घसरून पडलेल्या बहुतेकांना जीव गमवावा लागला आहे. तब्बल 140 फूट खोल दरीत कोसळल्यामुळे आता प्रदीपचेही काही खरे नाही, अशी परिस्थिती होती. मात्र, हा तरुण आश्चर्यकारकरीत्या बचावला असून पोलीस, कार्यकर्ते व अग्निशमन दलाच्या जवानांनाही प्रदीप सहीसलामत असल्याने सुखद धक्का बसला.