ऑनलाइन टीम / पुणे :
नेतृत्व, चारित्र, ज्ञान याद्वारे जगाचे नेतृत्व करता येईल. हे गुण स्काऊट चळवळीमध्ये शिकविले जातात. स्काऊट आणि गाईडचे जनक बेडन पॉवेल हे सैन्याधिकारी होते. बेडन पॉवेल यांनी जी जीवनमूल्ये या चळवळीत घेतली, ती सैन्यावर आधारित आहेत. सैन्यामध्ये स्काऊट नावाची बटालियन आहे, ते अत्यंत महत्त्वाचे काम करतात. स्काऊट ही कल्पना सैन्यातील आहे. सैनिक जेव्हा गस्तीला जातात, त्यापुढे स्काऊट असतो. त्यामुळे सैन्याच्या गस्त तुकडीचे डोळे आणि कान हे स्काऊट असतात, असे प्रतिपादन मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त) यांनी केले.
‘मुलांनी मुलांसाठी चालविलेली चळवळ’ असे ब्रीद अंगिकारुन कार्यरत असलेल्या भारतातील सर्वात जुन्या स्काऊट-गाईड खुल्या पथकांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेतील श्री शिवाजी कुल, पुणे या स्काऊट गाईड खुल्या पथकाच्या १०१ व्या वर्षानिमित्त टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित कुलरंग महोत्सवात स्व-रुपवर्धिनी संस्थेला बाल-कार्य सन्मान प्रदान करण्यात आला.
शशिकांत पित्रे म्हणाले, सौजन्यशीलता, प्रामाणिकपणा ही मूल्ये स्काऊटमध्ये आहेत. निसर्गाच्या सानिध्यात राहताना, मन व शरीराचा प्रचंड विकास होतो. तो विकास लहान मुलांचा व्हावा, याकरीता चळवळीचा उपयोग करण्यात आला. स्वत:ची स्वत: प्रत्येक गोष्ट मुलांना करायला लावून स्वावलंबनासारखे गुण नकळतपणे शिकविले जातात. पालकांनी अशा चळवळीमध्ये आजच्या पिढीतील मुलांना पाठवायला हवे.
पुरस्काराला उत्तर देताना ज्ञानेश पुरंदरे म्हणाले, कै.किशाभाऊ पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षात स्व-रुपवर्धिनीला बाल-कार्य सन्मान मिळाला, याचा आनंद आहे. स्काऊटची चळवळ ही जागतिक स्तरावर सुरु असलेली चळवळ आहे. स्काऊट चळवळीने जगामध्ये सर्व क्षेत्रात उमेदिने कार्य करणारे बालवीर व कार्यकर्ते उभे केले आहेत. त्यांचे हे कार्य समाजाला प्रेरणादायी आहे, असेही त्यांनी सांगितले. कुलवीरांनी सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर केले. पद्मजा लिमये, धनश्री कुंटे यांनी सूत्रसंचालन केले.