प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव येथे दर्ग्याच्या बाजूला दुकान लावू नका, असे सांगत असताना फिर्यादीस पाच जणांनी जीवे मारण्याची धमकी देत डोक्यात मारून जखमी केल्याप्रकरणी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी खलील अहमद मुरतुजा पटेल वय 36 रा.चपळगाव ता. अक्कलकोट हे चपळगाव येथे महिबूब सुबानी दर्गा येथे हात पाय धुण्यासाठी जात असताना दर्ग्याच्या बाजूलाच चपळगाव येथील दस्तगीर शेख व कासीम शेख हे दोघे दुकानात बसले होते. त्यावेळी त्यांच्यात व फिर्यादीमध्ये दुकानावरून वाद होऊन दोघांनी फिर्यादिस मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागले.
त्यावेळी रियाज अब्दुल पटेल, अस्लम उस्मान पटेल,जाकीरबाशा कवठेवकर, अतिफ कासीम शेख, निहाल अबुतराव पटेल ह्यांनी येत फिर्यादीस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या गळ्यातील दोन तोळ्यांची चैन तोडली व डाव्या खिशातील १० हजार काढून घेतले. तसेच फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने डोक्यात मारून जखमी केले आहे .याबाबत पाच जणांविरुद्ध फिर्यादीने अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार प्रवीण वाळके हे करीत आहेत.