कोरोनाचे नियम पाळून खरेदी-विक्रीला सुरुवात
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
अखेर दोन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी सोलापुरातील बाजारपेठा फुलल्या. नवी पेठेसह शहरातील सर्वच बाजारपेठेत दुकाने उघडली. कोरोनाचे नियम पाळून खरेदी-विक्रीला सुरुवात झाल्याचे दिसून आले.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी रात्री अनलॉक अंतर्गत सोलापूर शहरातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळेत उघडण्यास परवानगी दिली. रात्री उशीरा आदेश येवूनही शुक्रवारी सकाळी व्यापारी, कामगार आणि विक्रेत्यांनी उत्साहाने दुकाने उघडली. नवी पेठेत स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन रस्ते करण्यात येत आहेत. भाग्यश्री वडा ते नट्स या मार्गावर रस्त्याचे काही काम अद्याप बाकी आहे. नवी पेठ, मधला मारुती, अशोक चौक, टिळक चौकासह शहरातील सर्वच बाजारपेठेत मास्क लावून दुकानांमध्ये खरेदी-विक्री होताना दिसून आली.
जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसोबतच आता ग्राहकांना सर्व प्रकारची खरेदी करता येणार आहे. अनलॉकनंतर पहिल्याच दिवशी इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर, कपडÎांच्या दुकानात ग्राहकांनी प्रतिसाद दिला. दुपारी दोनपर्यंत बाजारपेठेत गर्दी दिसून आली. नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर पोलीसांकडून कारवाई सुरु होती.
व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदी वातावरण
लॉकडाऊनमुळे निराशा पसरली होती, अखेर दुकाने उघडल्याने बाजारपेठेत उत्साही वातावरण आहे. अनेक दिवसांपासून दुकाने उघडण्याची वाट पाहणाऱया ग्राहकांनी पहिल्याच दिवशी दुकानात येवून खरेदी केली. व्यापारी, विक्रेत्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. तिसऱया लाटेचा धोका टाळण्यासाठी सर्वांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
– खुशाल देढीया,उपाध्यक्ष, नवी पेठ व्यापारी असोसिएशन
स्थानिक दुकानदारांकडे खरेदी करा
कोरोनाचे नियम पाळून दुकाने उघडली आहे. प्रत्येक ग्राहकाला मास्क लावण्याचे आवाहन आम्ही करत आहोत. दोन महिने दुकाने बंद होती. लॉकडाऊनमध्ये अनेकांनी ऑनलाईन खरेदी केली आहे, आता आपल्या स्थानिक दुकानदारांकडून खरेदी करणे आवश्यक आहे. दुकानात वस्तू तपासून, डेमो पाहून घेता येते.
– हिशाम शेख, अध्यक्ष, सोलापूर मोबाईल असोसिएशन