प्रतिनिधी / वैराग
बार्शी तालुक्यातील ज्योतिबाचीवाडी जवळगाव क्रमांक 2 येथे आरटीआय कार्यकर्त्यास शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. आरटीआय कार्यकर्ता पळून जात असताना पंचायत समितीचे सभापतींनी गोळीबार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैराग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पंचायत समितीचे विद्यमान सभापती अनिल डिसले यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद गणपत ढेंगळे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 23 जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास ढेंगळे बसस्थानकावरुन घरी जात असताना घडली. वैराग पोलिसांनी मंगळवारी जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर महानिरीक्षक आणि सोलापूर जिल्हा पोलिस अधिक्षक यांचेकडे 22 जून रोजी अनिल बाबुराव डिसले (सभापती) सुरेश विश्वनाथ कापसे, व्यंकटेश कृष्णाथ ढेंगळे यांचेपासून जीवाला धोका आहे, असल्याची लेखी तक्रार प्रमोद देंगळे यांनी दिली होती. ज्योतिबाचीवाडी बसस्थानकावरुन घरी जात असताना 23 जून रोजी अनिल डिसले यांनी हाक मारुन मला थांबवले, तेथे जाताच डिसले यांनी माझ्या डोक्याला रिव्हॉल्व्हर लावली अश्लिल शिवीगाळ करीत तुला जिवंतच सोडत नाही, असे म्हणत असतानाच मध्यस्थीसाठी लहू डिसले आले.
मी तालुक्याचा सभापती आहे, एक दोन मर्डर सहज खपवू शकतो, आमदार आमचाच आहे पोलिस त्यांच्या खिशात आहे. तुम्ही अगोदर दिलेल्या तक्रारीचे पोलिसांनी काय केले तुम्हाला माहित आहे. असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथून येत असताना डिसले यांनी गोळीबार केल्याचेही ढेंगळेंनी सांगितले. तुला जीवंत सोडणार नाही आमदार साहेबांशी बोलणे झाले आहे, आमदार साहेबांनी सांगितले आहे. तुमच्या राजकारणात येणाराला सरळ ठार मारा मी बघून घेतो काही काळजी करु नका, असे ढेंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तपास पोलिस निरीक्षक विनय बहिर करीत आहेत.