तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
मागील एक महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देऊन फिरणारा मटकाकिंग नगरसेवक सुनील कामाटीला अखेर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हैदराबाद येथे जाऊन जेरबंद केले.
न्यू पाच्छा पेठ परिसरातील कोंचीकोरवी गल्ली परिसरात चालणाऱ्या मटका जुगाराच्या कंपनीवर 24 ऑगस्ट रोजी शहर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला होता. यावेळी इमारतीवरून उडी मारल्याने परवेझ नुरूद्दीन इनामदार (वय 42, रा. साईनाथ नगर, भाग 1, नईजिंदगी सोलापूर) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सुनील कामाटी सोलापूर शहर जिल्हा सोडून फरार झालाा होता. त्याच्या तपासाकरिता गुन्हे शाखेचे पथक कर्नाटक तसेच आंध्रप्रदेशात जाऊन आले होती. या प्रकरणावर पडदा टाकण्यात यावा यासाठी त्याने त्याचे राजकीय वजन ही वापरले. परंतु पोलीस प्रशासनाकडून त्याला कोणतीही भिक घातली गेली नाही. अखेर बुधवारी पहाटे हैदराबाद येथे जाऊन त्यास शहर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. आज दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ संजय जगताप यांनी दिली.