प्रतिनिधी /बेळगाव
एका संस्थेला शंभर वर्षे होत आहेत, त्याअर्थी ही संस्था चांगले काम करीत आहे. ब्रिटिश काळातील ही संस्था आजही सुरू असून ही चांगली बाब आहे. महत्त्वाचे म्हणजे या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. या ठिकाणी व्यायामशाळा आणि गेस्ट हाऊस सुरू करून चांगली सोय करण्यात आली असल्याचे सांगून क्लबला मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सोशल क्लब आणि क्रीडा भवनच्या नामफलकाच्या कोनशिलेचे अनावरण व व्यायामशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले.
यावेळी दीपप्रज्वलन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, आमदार अनिल बेनके, अमित कोरे, व्हीटीयुचे सदस्य आनंद हावण्णवर, क्लबचे अध्यक्ष मुर्गेश धपलापूरे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.