लठ्ठ लोक अधिक प्रमाणात बाधित झाल्याने ब्रिटन सरकारचा निर्णय : जगभरात 1 कोटी 64 लाख 46 हजार 326 रुग्ण
ब्रिटन सरकारने लोकांना स्थुलत्वापासून वाचविण्यासाठी नियम तयार केले आहेत. रात्री 9 वाजण्यापूर्वी जंक फूडच्या प्रचारावर बंदी असणार आहे. तसेच या पदार्थांवर ‘एकासोबत एक मोफत’ अशी योजना बंद करावी लागणार आहे. या पदार्थांच्या वेष्टनावर कॅलरीचे प्रमाणही नमूद करावे लागणार आहे. कोरोना विषाणूचा स्थुलत्वाशी असलेले संबंध समोर आल्यावर पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हा निर्णय घेतला आहे. अतिदक्षता विभागात दाखल रुग्णांपैकी सुमारे 8 टक्के स्थुलत्वाचेही रुग्ण आहेत. परंतु एकूण लोकसंख्येच्या 2.9 लोकच स्थुलत्वाचे रुग्ण आहेत.
जपान : 839 नवे रुग्ण
जपानमध्ये कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला आहे. तेथे मागील 24 तासांमध्ये 839 नवे रुग्ण सापडले आहेत. राजधानी टोकियोमध्ये 239 रुग्णांची भर पडली आहे. देशातील बाधितांचा आकडा आता 30 हजार 701 झाला असून 1,009 जणांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोना संकटामुळे जपानमध्ये ऑलिम्पिक आयोजित होऊ नये याकरता काही संघटनांनी निदर्शने चालविली आहेत.
हाँगकाँग : मास्क अनिवार्य
हाँगकाँगमध्येसार्वजनिक ठिकाणी 4 ऑगस्टपर्यंत मास्क परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मास्क परिधान न केल्यास 645 डॉलर्सचा (सुमारे 49 हजार रुपये) दंड ठोठावला जाणार आहे. शहरात कोरोना संसर्गाची तिसरी लाट उद्भवली आहे. 6 दिवसांपासून 100 पेक्षा अधिक रुग्ण सापडत असल्याची माहिती मुख्य सचिव मॅथ्यू श्युंग यांनी दिली आहे.
फ्रान्स : सर्वांसाठी चाचणी मोफत
फ्रान्समध्ये सर्व नागरिकांसाठी कोरोना विषाणूची चाचणी मोफत करण्यात आली आहे. आरोग्यमंत्री ओलिवर वेरान यांनी याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना कोरोनाची चाचणी करता येणार आहे. तसेच यापूर्वी चाचणीसाठी शुल्क दिलेल्या नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.फ्रान्स सरकारच्या या निर्णयामुळे सर्व नागरिकांना चाचणी करणे शक्य होणार आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1,80,528 बाधित सापडले असून 30 हजार 192 जणांना जीव गमवावा लागला आहे.
उज्बेकिस्तानात टाळेबंदी वाढली
उज्बेकिस्तानात 15 ऑगस्टपर्यंत टाळेबंदी वाढविण्यात आली आहे. देशातील ही तिसरी टाळेबंदी आहे. दुसरी टाळेबंदी 10 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत लागू करण्यात आली होती. 3 कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशात 20 हजार 531 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर 116 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
प्रतिकारकशक्तीला चकवा देण्याचा कोरोनाचा प्रयत्न
कोरोना विषाणूशी निगडित नवी माहिती समोर आली आहे. हा विषाणू मानवी रोग प्रतिकारकशक्तीला चकवा देत संसर्ग फैलावण्याचा प्रयत्न करतो. कोरोना विषाणू एका मॉलिक्यूलच्या मदतीने स्वतःच्या जेनेटिक सीक्वेंसला अशा रुपात परावर्तित करतो, जेणेकरून तो पीडिताच्या जेनेटिक सीक्वेंसचा हिस्सा वाटू लागतो. या नव्या माहितीमुळे विषाणूच्या विरोधात अँटीव्हायरल औषध तयार करण्यास मदत मिळणार असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
प्रतिकारकशक्तीला अलर्ट
कोरोना एकप्रकारे भ्रमित करत असल्याचे संशोधक योगेश गुप्ता यांनी म्हटले आहे. कोरोनाचा एम-आरएनए रुग्णाच्या एम-आरएनएप्रमाणे भासतो. याच कारणामुळे रोगप्रतिकारकशक्ती त्याला बाहेरील घटक ठरवत नाही. ही माहिती डोळय़ासमोर ठेवून औषध निर्माण केल्यास ते कोरोना संसर्गावर प्रभावी ठरणार आहे. औषधाचे सेवन केल्यावर रोगप्रतिकारकशक्ती रुग्ण आणि कोरोनाच्या एम-आरएनएमधील फरक ओळखू शकेल आणि विषाणूला बाहेरील घटक समजून लढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गुप्ता म्हणाले.
एंजाइमचे 3-डी स्ट्रक्चर
गुप्ता यांनी शरीरातील संख्या वाढविण्यास कोरोना मदत घेणाऱया एंजाइमचे 3डी स्ट्रक्चर शोधून काढले आहे. ही माहिती अत्यंत महत्त्वाची असल्याचे उद्गार संशोधक रोमास यांनी काढले आहेत.
विषाणू असा देतो चकवा
अमेरिकेच्या टेक्सास हेल्थ सायन्स सेंटरच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार मॉलिक्युल एनएसपी10 विषाणूच्या एम-आरएनएला बाधित व्यक्तीच्या पेशीच्या एम-आरएनए सारख्या रुपात परावर्तित करतो. असे घडल्याने विषाणू बाधिताच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या पल्ल्यात येण्यापासून बचावतो.
चीन : 61 नवे रुग्ण
चीनमध्ये सोमवारी 61 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. एप्रिलनंतर पहिल्यांदाच इतक्या अधिक संख्येत रुग्ण सापडले आहेत. 4 रुग्ण विदेशी असून यातील दोन जण मंगोलिया स्वायत्त क्षेत्र, 1 फूजियात आणि 1 शिचुआन प्रांतात आढळला आहे. चीनमध्ये आतार्यंत 83 हजार 891 रुग्ण सापडले असून 4,634 जण दगावले आहेत.
ब्राझील : 24,000 बाधित
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 24 हजार 578 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 555 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 24,19,901 रुग्ण सापडले असून 87,052 जणांचा बळी गेला आहे. तर 16 लाखांपेक्षा अधिक बाधितांना महामारीतून मुक्तता मिळाली आहे. देशातील संसर्ग घटल्याचेही चित्र दिसून येतेय.
सौदी अरेबियातही वाढता संसर्ग
सौदी अरेबियात दिवसभरात 1,968 नवे रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 2 लाख 66 हजार 941 झाली आहे. तेथे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. देशात आतापर्यंत 2,20,323 रुग्णांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे. याचदरम्यान दिवसभरात 30 रुग्णांचा मृत्यू ओढवल्याने बळींचे प्रमाण 2,733 वर पोहोचले आहे.