वृत्तसंस्था/ पॅरीस
सोमवारी घोषित करण्यात आलेल्या पुरूष टेनिसपटूंच्या एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत स्पेनच्या राफेल नदालने मानांकनात दुसरे स्थान मिळविले. या यादीत सर्बियाचा जोकोविच अग्रस्थानावर आहे. रविवारी नदालने बार्सिलोना टेनिस स्पर्धा जिंकल्याने त्याचे मानांकनातील स्थान वधारले. नदालने रशियाच्या मेदव्हेदेवला पुन्हा दुसऱया स्थानावरून खाली खेचले.
34 वर्षीय नदालने रविवारी बार्सिलोना क्लेकोर्ट टेनिस स्पर्धा 12 व्यांदा जिंकली. या जेतेपदामुळे नदालने पुन्हा दुसरे स्थान मिळविले. जोकोविचचे अग्रस्थान मात्र शाबूत आणि भक्कम राहिले आहे. नदाल आणि मेदेव्हेदेव यांच्यात आता 110 मानांकन गुणांचा फरक आहे.
एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सर्बियाचा जोकोविच 11963 मानांकन गुणांसह पहिल्या, स्पेनचा नदाल 9810 गुणांसह दुसऱया, रशियाचा मेदव्हेदेव 9700 गुणांसह तिसऱया, ऑस्ट्रीयाचा थिएम 8365 गुणांसह चौथ्या, ग्रीकचा सित्सिपस 7980 गुणांसह पाचव्या, जर्मनीचा ऍलेक्झांडर व्हेरेव्ह 6125 गुणांसह सहाव्या, रशियाचा रूबलेव्ह 6000 गुणांसह सातव्या, स्वीसचा रॉजर फेडरर 5875 गुणांसह आठव्या, अर्जेंटिनाचा शुवार्त्झमन 3765 गुणांसह नवव्या आणि इटलीचा बेरेटेनी 3568 गुणांसह दहाव्या स्थानावर आहेत.