आंबेली क्लबचा 9-1 गोलानी पराभव; राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत स्पोर्टिंग करणार गोव्याचे प्रतिनिधीत्व
क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
अंतिम लढतीत आंबेली स्पोर्ट्स क्लबचा 9-1 गोलांनी फडशा पाडून स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाने गोवा फुटबॉल संघटनेने आयोजित केलेल्या राज्य फुटसाल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले. अंतिम सामना येथील चौगुले फुटसाल एरिनावर खेळविण्यात आला.
पहिल्या सत्रात दोन्ही संघानी आक्रमक खेळ केला, मात्रगोल करण्यात मात्र उभय संघ अपयशी ठरले. दुसऱया सत्रात स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाच्या आक्रमक खेळासमोर आंबेली क्लब हतबल ठरला व यात स्पोर्टिंगने प्रतिस्पर्धी संघावर नऊ गोल लादले. दुसऱया सत्राच्या पहिल्याच मिनिटाला लॉईड कार्दोझने गोल करून स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाचे खाते उघडले. त्यानंतर लॉईडने पाच मिनिटात दोन गोल करून आपली हॅट्ट्रिक आणि संघाचा तिसरा गोल केला.
त्यानंतर चार मिनिटात मार्पुस मास्कारेन्हसने दोन आणि लॉईड कार्दोझने प्रत्येकी दोन गोल करून स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाची आघाडी 7-0 अशी केली. शेवटच्या क्षणी एल्टॉन वाझ आणि क्लाईव्ह मिरांडाने स्पोर्टिंगचे आणखी दोन गोल करून गोलाची संख्या नऊवर नेली. आंबेली स्पोर्ट्स क्लबचा एकमेव गोल लिडेन कार्दोझ याने केला.
राज्य फुटसाल स्पर्धेच्या अजिंक्यपदाने स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या राष्ट्रीय फुटसाल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व करण्याची पात्रता मिळविली आहे. स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाच्या लॉईड कार्दोझची अंतिम सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू, मार्पुस मास्कारेन्हसची स्पर्धेतील उत्कृष्ट स्ट्रायकर, ओझेन सिल्वाची उत्कृष्ट गोलरक्षक तर क्लाईव्ह मिरांडाची स्पर्धेतील उत्कृष्ट डिफेंडर पुरस्कारासाठी निवड झाली.
विजयी स्पोर्टिंग क्लुब दी गोवा संघाला रोख 30,000 व चषक तर उपविजेत्या आंबेली स्पोर्ट्स क्लबला रोख 20,000 व चषक प्राप्त झाला. बक्षीस वितरण गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष चर्चिल आलेमाव यांच्या हस्ते झाले. यावेळी जीएफएचे उपाध्यक्ष्ला अँथनी पांगो, फुटसाल आणि बीच फुटसाल समितीचे चेअरमन बाबली मांद्रेकर, उपचेअरमन जॉन सिल्वा, एफसी वायएफएचे सुकूर वाझ तसेच जीएफएच्या कार्यकारी समितीतील सदस्य उपस्थित होते.