प्रतिनिधी / सातारा
कोरोना संसर्ग काळात माणुसकीचे अन् माणुसकी नसण्याचे अनेकविध अनुभव सर्वांनाच आले. मात्र, या काळात माणुसकीच्याहीपलिकडे जावून स्मशानभूमीवर कार्यरत राहून मृत्यूनंतरचा अनंतकालाचा प्रवास सुकर करताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कैलास स्मशानभूमीवरील त्या सात कर्मचाऱ्यांचा स्व. पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्काराने गौरव झाला अन् उपस्थितांची मने भारावून गेली. दरम्यान, या पुरस्काराने आम्हाला बळ मिळाल्याची भावना सर्व कोरोना योध्दांतर्फे चंद्रकांत पुंभार व साजिद शेख यांनी व्यक्त केली.
सदरबझार येथील हिरवाई संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणारा स्व. पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार यावर्षी कैलास स्मशानभूमीत गेली सात ते आठ महिने निर्भिडपणे प्रामाणिक सेवा बजावणाऱ्या चंद्रकांत लक्ष्मण कुंभार, टेकराम राजाराम शिर्के, अशोक संपतराव जाधव, सचिन बाबूराव सोनावणे, बाळू ज्ञानदेव गायकवाड, वैशाली नवनाथ वाघ, सुनिता बाळकृष्ण माने यांना सुप्रसिध्द कार्डिओलॉजिस्ट डॉ. सोमनाथ साबळे व सुप्रसिध्द फिजिशियन डॉ. युवराज पवार यांच्या हस्ते देवून गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर होते. हिरवाई संस्थेने सामाजिक बांधिलकीतून वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. वृक्षारोपण चळवळीतून निर्माण झालेल्या संस्थेच्या कार्याची दखल राज्यपातळीवर घेण्यात आलेली आहे.
यावर्षी कोरोना कालावधीत मृतांवर अंत्यसंस्कार करायचे म्हटले तरी जाता येत नव्हते. अगदी अनेकांना स्वतःच्या मातापित्यांच्या अंत्यसंस्कारांना देखील उपस्थित राहता आले नाही. अनेकविध हृदयद्रावक घटना या काळात अनुभवत असताना कैलास स्मशानभूमीत कोरोना बाधितांबरोबरच इतर नैसर्गिक मृत पावलेल्यांवर अंत्यसंस्कार होत होते. सगळे जग घाबरलेले असताना कैलास स्मशान भूमीतील हे सात कोरोना योध्दे निर्भिडपणे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांच्या नेतृत्वाखाली लढत होते. शेवटच्या प्रवासाला निघालेल्या सर्वांवर अंत्यसंस्कार करताना सर्व सोपस्कर पूर्ण करत होते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल हिरवाई संस्थेने घेतली अन् या सात कर्मचाऱ्यांना यावर्षीचा स्व. पांडुरंग चौगुले स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करुन त्यांच्या सेवेचा गौरव केला. या कार्यक्रमाला माणुसकीच्या गौरवाची वेगळी संवेदनशील झालर होती.
यावेळी बोलताना डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले, आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्मृती चांगल्या प्रकारे जागवणे हे काय असते हे आजच्या कार्यक्रमामुळे आपल्या सगळयांना कळेल. फक्त दु:ख व्यक्त न करता त्यांच्या स्मृती कशा प्रकारे जपाव्यात यांचे चांगले वस्तूपाठ चौगुले, यादव कुटुंबियांनी आपल्या समोर ठेवला आहे. त्यांना जे आवडेल ते आपण केले पाहिजे. मी अंधश्रद्धा निमुर्लनाचे काम करतो. आणि आमच्या कामाची नेहमी धारणा राहिली आहे की, समाजातील ज्या शोषण करणाऱया रूढी आहेत त्यांना आपण चांगले पर्याय देवू. आपल्याला अनेक जणांना यांची कल्पना आहे की बऱयाच रूढी परंपरा या जन्म व मृत्यूच्या दरम्यान बांधलेल्या आहेत.
सातारा पालिकेच्या कोरोना योध्दांचा सत्कार
साताऱयातील सर्व कोविड हॉस्पिटल्स मधून कोरोनाने मयत झालेल्या लोकांना गोळा करून शववाहिकेतून एकत्रितपणे स्मशानभूमीपर्यंत पोहोचवणारे नगरपालिकेचे कर्मचारी विकास मारुती जाधव आणि संदीप पाटसुटे यांचाही यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात विशेष सत्कार घेण्यात आला. गेंडामाळ येथील कब्रस्तानामध्ये दफनविधीमध्ये विशेष कामगिरी करणार्या साजिद अब्दुलगनी शेख आणि निसार मुसा कच्छी या दोन कोरोना योद्ध्यांचाही यावेळी हिरवाईच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.
मानवतेच्या कामाचा गौरव : डॉ. सोमनाथ साबळे
सातारचे प्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट डॉ. सोमनाथ साबळे म्हणाले, खरे पाहता करोनाचा हा काळ माणसातील माणूसपण ओळखण्याचा काळ आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये पाहतो भल्याभल्या प्रतिष्ठितांची मुले कोरोनाने मृत झालेल्या आपल्या आईवडिलांना स्वीकारण्यात कुचराई करत आहेत. प्रेताचे पुढील विधी तुम्हीच उरकून घ्या असे सांगत आहेत. अशा पार्श्वभूमीवर या जागतिक महामारीच्या काळामध्ये जे लोक पुढे होऊन अत्यंत मानवतेने, तळमळीने अंत्यसंस्काराचे काम करत आहेत. ते या पुरस्कारांची खरे मानकरी आहेत .