औद्योगिक, खासगी कामगारांना उपयुक्त : विविध योजनांचा मिळविता येणार लाभ
प्रतिनिधी / पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी ऑनलाईन पद्धतीने स्मार्ट लेबर कार्डचा शुभारंभ केला. औद्योगिक व खासगी क्षेत्रात काम करणाऱया सर्व कामगारवर्गाने ते कार्ड घेऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. सावंत यांनी केले आहे.
कामगार खात्याचा मंत्री जोनिफर मोन्सेरात, कामगार खात्याचे सचिव संजय कुमार, कामगार आयुक्त राजू गांवस व इतरांची यावेळी उपस्थिती होती.
कामगार खात्याचे चांगले पाऊल
कामगार खात्याने प्रथमच अशा प्रकारचे स्मार्ट लेबर कार्डाचे प्रायोजन केले असून त्याचा लाभ असंघटीत क्षेत्रातील सर्व कामगार कर्मचारी वर्गास होणार आहे. कामगार खात्यातर्फे सदर कार्ड देण्यात येणार असून त्याद्वारे कामगार खात्याच्या विविध योजनांचा लाभ त्यांना घेता येणे शक्य होणार आहे. यापूर्वी अशा प्रकारची कार्डे कधी उपयोगात आणली नव्हती. कामगार खात्याने हे एक चांगले पाऊल उचलले असून त्याचा लाभ सर्व कामगारांना मिळून देण्याचा खात्याचा इरादा आहे असे डॉ. सावंत यांनी सांगितले आणि खात्याचे अभिनंदन केले. कामगार, खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग अशा सर्वांना त्याचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.
गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडतर्फे (जीईएल) या स्मार्ट लेबर कार्डाचे वितरण करण्यात येणार असून हे कामगारांची काळजी घेणारे, कामगारांचे सरकार असल्याचा दावा डॉ. सावंत यांनी त्यानिमित्ताने केला आहे.