गांधीनगरमध्ये शिवसेनेचे आवाहन
उचगांव / वार्ताहर
स्वदेशी वस्तुंची विक्री करा, चिनी वस्तू हद्दपार करा, देव- देवतांचे छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नका, असे आवाहन करवीर तालुका शिवसेनेच्यावतीने गांधीनगर बाजारपेठेतील व्यापारी बांधवांना करण्यात आले.
पाकिस्तान व चीनच्या विरोधात भारतात संतापाची भावना आहे. भारतीय सेना चीनला जशास तसे उत्तर देण्यासाठी सज्ज आहे. असे असताना भारतीय बाजार चिनी उत्पादनाने व्यापून गेलेला आहे. असंख्य चिनी वस्तू बाजारात दिसून येतात. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर चिनी वस्तू स्वस्त असल्याने ग्राहकांचा या वस्तू खरेदीवर भर असतो, मात्र अशा वस्तू विकून चीनने भारतीय बाजारपेठ काबीज करण्याचे लक्ष्य केले आहे. सर्व व्यापारी व नागरिकांनी एकत्र येऊन चीनच्या उत्पादित वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार घालून चीनची आर्थिक कोंडी करण्याची ही योग्य वेळ आहे. व्यापाऱ्यांनी स्वदेशी वस्तू विक्री करावी व नागरिकांनीही स्वदेशी वस्तूंची मागणी करावी.
हिंदू देवदेवतांची छायाचित्र असलेल्या फटाके विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. ते फटाके फुटल्यानंतर देव-देवतांच्या छायाचित्राचे छोटे छोटे तुकडे होत असतात. आपल्या देवी-देवतांची विटंबना होते. ती होऊ नये म्हणून अशा प्रकारचे फटाके विक्री करु नयेत अन्यथा आपल्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. तसे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने व्यापारी बांधवांना देण्यात आले. गांधीनगर बाजारपेठेतील दुकानांमध्ये चिनी वस्तू व देवदेवतांचे छायाचित्र असलेले फटाके विक्री करू नये याबाबत संबंधित दुकानदारांना निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, गांधीनगर प्रमुख दिलीप सावंत, दीपक पोपटाणी, दीपक अंकल, सुनील पारपाणी, बाबुराव पाटील, शिवानंद स्वामी, प्रफुल्ल घोरपडे आदी उपस्थित होते.