प्रतिनिधी /फोंडा
फोंडा येथील ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्य सैनिक व निवृत्त शिक्षक श्रीधर शेट वेरेंकर (81) यांचे काल सोमवारी सकाळी 10 वा. अल्प आजाराने निधन झाले. सायंकाळी सिल्वानगर येथील वैश्य स्मशानभूमित त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
श्रीधर वेरेकर यांनी 1963 पासून पत्रकारितेला सुरुवात केली. एका प्रतिष्ठित इंग्रजी दैनिकांत ते फोंडा व सत्तरी तालुक्यातून वार्तांकन करायचे. त्यानंतर बराच काळ इंग्रजीबरोबरच, मराठी दैनिकांमध्येही त्यांनी पत्रकारिता केली. फोंडा पत्रकार संघाचे ते संस्थापक सदस्य होते. फोंडा पत्रकार संघाच्या स्वरसम्राज्ञी गिरीजाताई केळेकर संगीत महोत्सवाच्या संस्थापकांपैकी ते एक होते. गोवा मुक्तीलढय़ात त्यांचा सक्रीय सहभाग होता. मुक्तीनंतर ग्रामीण भागात विशेषतः डिचोली व सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात दीर्घकाळ शिक्षक म्हणून त्यांनी विद्यादान केले. या भागात काही शाळा सुरु करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. सन 2002 पर्यंत पत्रकारिता क्षेत्रात ते कार्यरत होते. वयपरत्वे त्यांनी पत्रकारिता कमी केली तरी त्यांचे इतर लिखाण सातत्याने सुरु होते. इंग्रजी, मराठी, कोकणी व हिंदी भाषेतून त्यांची सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. फोंडय़ातील सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा. त्यांच्या निधनाबद्दल फोंडा पत्रकार संघ व अंत्रुज पत्रकार संघातर्फे दुःख व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्याश्चात पत्नी मंगला, पुत्र दुर्गेश व रुद्रेश तसेच कन्या कोषा, स्नुषा नातवंडे असा परिवार आहे.