युरो चषक फुटबॉल स्पर्धा
बुडापेस्ट / वृत्तसंस्था
युरोपियन चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धेत हंगेरीने शनिवारी बलाढय़ फ्रान्सला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम गाजवला. पुस्कास एरेनावर आयोजित या लढतीत उभय संघातील ही लढत 1-1 फरकाने बरोबरीत राहिली. 65 हजार पेक्षकांमध्ये हंगेरियन चाहत्यांची उपस्थिती लक्षवेधी होती.
हंगेरीतर्फे पहिल्या सत्राअखेर स्टॉपेज टाईममध्ये ऍटिला फिओलाने गोल नोंदवत एकच खळबळ उडवून दिली. नंतर दुसऱया सत्रातील खेळात 66 व्या मिनिटाला ऍन्टोईन ग्रिएझमनने फ्रान्ससाठी बरोबरीचा गोल केला. पुढे, दोन्ही संघांनी काही प्रमाणात आक्रमणावर भर दिला. पण, 1-1 गोलकोंडी कायम राहिली व दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला.
या स्पर्धेत हंगेरीचा साखळी फेरीतील पुढील सामना जर्मनीविरुद्ध बुधवारी होणार असून त्याचवेळी पोर्तुगाल-फ्रान्स हे दिग्गज संघ देखील आमनेसामने भिडणार आहेत.