आसाममधील विचित्र घटना
आसामच्या गोलाघाट जिल्हय़ात एका युवकाच्या हत्येच्या आरोपाप्रकरणी पोलिसांनी हत्तिण आणि तिच्या पिल्लाला पकडून नेले आहे. पण चौकशीनंतर पोलिसांनी दोघांनाही वन अधिकाऱयांच्या स्वाधीन केले आहे. सोशल मीडियावर हे प्रकरण व्हायरल झाले आहे. आता हत्तीला न्यायालयासमोर हजर करणार का असा प्रश्न एका युजर्सने उपस्थित केला आहे. तर हत्तिणीकडून साक्ष कोण देणार अशी मजेशीर विचारणाही होत आहे.
गोलाघाट जिल्हय़ातील युवकाच्या कथित हत्येच्या आरोपाखाली हत्तिण आणि तिच्या पिल्लाला बोकाघाट पोलीस स्थानकात आणले गेले होते. 8 जुलै रोजी गोलाघाटच्या बोकाघाट भागा दुलुमोनी नावाच्या हत्तिणीने कथितरित्या एका युवकाची हत्या केली होती. जनआक्रोशानंतर पोलिसाहंनी भादंविचे कलम 304 अ अंतर्गत (निष्काळजीपणामुळे मृत्यूचे कारण ठरणे) गुन्हा नोंदवून हत्तिण आणि तिच्या पिल्लाला ताब्यात घेतले होते. हत्तिणीला ताब्यात घेतले तरीही तिची चौकशी कशी करणार हा यक्षप्रश्न पोलिसांसमोर उभा ठाकला असणार हे निश्चित.