अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 19 मे 2021, सकाळी 10.00
● 24 तासात 2692 बाधित ● रूग्णवाढीच्या आकड्याची पुन्हा उसळी● जिल्हा अजुनही धोक्याच्या पातळीवरच ● नियम न पाळणारांचा हलगर्जीपणा नडतोय ● फलटण, सातारा, कराडला बाधितांची वाढ थांबेना ● जिल्ह्यात 22 हजार 99 रूग्ण उपचारार्थ ● एकूण रूग्ण संख्या 1 लाख 41 हजारावर
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाल्याचे दिसत असले तरी सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयातील स्वॅब तपासणी यंत्रणा बंद असल्याने तीन हजारांपेक्षा जास्त तपासणी नमुने प्रलंबित आहेत. त्यामुळे अहवाल यायला उशीर लागत असून तोपर्यंत अपवाद वगळता स्वॅब तपासणीला दिलेले कितीतरी लोक इतरांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे संसर्ग वाढीचा धोका आणखी वाढला असून स्वॅब तपासणीला दिलेल्या नागरिकांसाठी जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत कडक नियमांची अमलबजावणी करण्याचे आदेश नव्याने देण्याची व स्थानिक प्रशासनाने त्याची कडक अमलबजावणी करण्याची गरज आहे. दरम्यान गेल्या 24 तासात कोरोना रूग्णांचा आकडा 2692 एवढा विक्रमी वाढला असून बाधितांची एकूण वाढ दीड लाखांच्या दिशेने निघाली आहे. गेल्या 24 तासातील ही रूग्णवाढ जिल्ह्याच्या दृष्टीने चिंता वाढवणारी आहे.
गृहविलगीकरणातील रूग्णांसह नातेवाईकांकडून नियमांना हरताळ
जिल्ह्यात सध्या 22 हजार 99 रूग्ण उपचार घेत आहेत. यातील 80 टक्के रूग्ण गृहविलिगीकरणात आहेत. गृहवलिगीकरणात असलेले बरेच रूग्ण व त्यांचे नातेवाईक पुरपूर काळजी घेत इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून नियम पाळत आहेत. मात्र सातारा, कराड, मलकापूर सारख्या शहरात गृहविलिगीकरणात असलेल्या अनेक रूग्णांचे नातेवाईक हे बिनधास्त बाहेर वावरत आहेत. काही स्थानिक नगरपालिकांनी रूग्णांच्या घराबाहेर कोरोना प्रतिबंधक क्षेत्र असे फलक लावलेले दिसत नाहीत. तर काहींनी लावलेले फलक स्वताच काढून ठेवल्याचे दिसते. गृहवलिगिकरणातील रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपले तर संसर्ग वाढणार नाही. स्थानिक प्रशासनाने त्यासाठी कडक भुमिका घेण्याची गरज आहे.
जिल्ह्यात रूग्णवाढीची पुन्हा उसळी
सोमवारी जिल्ह्यात 881 रूग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर हा आकडा 1310 पर्यंंत आला होता. मात्र बुधवारी सकाळी आलेल्या अहवालात पुन्हा एकदा धक्कादायक रूग्णवाढ झाली असून 2692 एवढी विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग कमी झाल्याचा भ्रमात न राहता नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. यातच सातारा जिल्हा शासकीय रूग्णालयातील स्वॅब तपासणी यंत्रणा बंद पडल्याने अनेक रूग्णांचे अहवाल अजुनही प्रलंबित आहेत.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 6,45,677, एकूण बाधित 1,41312, एकूण कोरोनामुक्त 1,15,937, मृत्यू 3,253, उपचारार्थ रुग्ण 22,099
*मंगळवारी जिल्हय़ात बाधित 2692, मुक्त 3,314, बळी 30