इस्लामाबाद
जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदला पाकिस्तानच्या न्यायालयाच्या अधिकाऱयाने निर्दोष ठरविले आहे. पाकिस्तानच्या अधिकाऱयानुसार हाफिज सईद पंजाब प्रांतातील दहशतवादाला वित्तपुरवठय़ाप्रकरणी दोषी ठरलेला नाही. मुंबईमध्ये झालेल्या 26/11 हल्ल्यांचा सूत्रधार असलेला हाफिज सईदवर कारवाई करण्यास पाकिस्तान टाळाटाळ करत आहे. हाफिजच्या विरोधात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात दहशतवादाला वित्तपुरवठा केल्याप्रकरणी अनेक गुन्हे नोंद आहेत. दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी वाढत्या दबावामुळे पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयात हाफिजने मंगळवारी स्वतःची साक्ष नोंदविली आहे. पाकिस्तान जगासमोर केवळ कारवाईचा देखावा करत आहे.
सईद सध्या लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात कैद आहे. त्याच्या विरोधात 23 गुन्हे नोंद असून 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हाफिजच्या विरोधात कारवाईचे नाटक चालविले आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारण्याचे काम जमात-उद-दावाकडून केले जाते.
दहशतवादी संघटनांना मिळणाऱया मदतीमुळे पाकिस्तानवर एफएटीएफ आणि अमेरिकेने नजर ठेवली आहे. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेनेच 2008 साली मुंबईत हल्ले घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेच्या 6 नागरिकांसह 166 जण मारले गेले होते.
काळय़ा यादीत समावेश?
27 फेब्रुवारीपर्यंत निर्धारित लक्ष्यांची पूर्तता न केल्यास तसेच दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा न रोखण्यास काळय़ा यादीत समाविष्ट करण्याचा इशारा एफएटीएफने पाकिस्तानला दिला आहे.