ऑनलाईन टीम / मुंबई :
आशिया खंडातील सर्वात मोठय़ा समजल्या जाणाऱया मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. या मॅरेथॉनमध्ये 55 हजार धावपटूंनी सहभाग घेतला आहे. तर महिलांनी ‘हाफ रन’ मॅरेथॉनमध्ये ठसा उमटवला आहे.
मुंबईतील या मॅरेथॉनचे हे सतरावे वर्ष आहे. आशिया खंडातील ही सर्वात मोठी मॅरेथॉन असून, या मॅरेथॉनला मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळाला आहे. कडाक्याच्या थंडीतदेखील मुंबईकरांनी या मॅरेथॉनला जोरदार प्रतिसाद दिला आहे. मुंबईबरोबरच देश-विदेशातील नामांकित धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत धावपटूंची संख्या 9 हजारांनी वाढली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या मॅरेथॉनला पहाटे 5.15 मिनिटांनी सुरूवात झाली. मुंबई मॅरेथॉन टीमने ’बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम 2020’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून या मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. तर वरळी डेअरी येथून अर्धमॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. मॅरेथॉनच्या एलिट गटामध्ये इथियोपिया आणि केनिया या आफ्रिकन देशातील धावपटूंमध्ये मुख्य स्पर्धा रंगणार आहे. एकूण 4 लाख 20 हजार यूएस डॉलर किंमतीची बक्षिस रक्कम असलेल्या या मॅरेथॉनमध्ये मुख्य स्पर्धेतील पहिल्या तीन धावपटूंना अनुक्रमे 45 हजार, 25 हजार आणि 17 हजार डॉलरचे रोख पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.