विद्युतपंप सुरक्षितस्थळी हलविले : चार दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद
प्रतिनिधी / बेळगाव
पावसाचा जोर वाढल्याने मार्कंडेय नदीला पूर आला असून आंबेवाडी गावाला जाणाऱया रस्त्यावरून पाणी वाहत आहे. पाण्याची पातळी वाढल्याने नदीचे पाणी हिंडलगा पंपिंग स्टेशनमध्ये शिरले आहे. त्यामुळे खबरदारीच्या उपाययोजना म्हणून पंपिंग स्टेशनमधील विद्युतपंप बंद ठेवून हटविण्यात आले आहेत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार आहे.
पावसाचा जोर सर्वत्रच वाढला असून महाराष्ट्र हद्दीतदेखील पावसाचा मारा सुरूच आहे. राकसकोप जलाशय तुडुंब भरले असून धोक्मयाची पातळी ओलांडल्याने जलाशयातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीला सोडण्यात आले आहे. राकसकोप जलाशयाचे तीन दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले आहेत. मार्कंडेय नदीपात्र तुडुंब भरून वाहू लागले असून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
मार्कंडेय नदीचे पाणी हिंडलगा पंपिंग हाऊसमध्ये शिरल्याने येथील विद्युतपंपांना धोका निर्माण झाला आहे. 600 अश्वशक्तीचे चार विद्युतपंप व 400 अश्वशक्तीच्या दोन विद्युतपंपांद्वारे लक्ष्मीटेकडी जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा केला जातो. पण नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने सर्व पंप गुरुवारी रात्री दोन वाजल्यापासून बंद ठेवण्यात आले.
24 तास पाणीपुरवठा योजनेसह
संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार
पंपांचे नुकसान होऊ नये याकरिता सुरक्षित ठिकाणी पंप ठेवण्यात आले आहेत. परिणामी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. पाण्याची पातळी कमी झाल्यानंतरच विद्युतपंप पुन्हा बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे चार दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. परिणामी 24 तास पाणीपुरवठा योजनेसह संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाने दिली आहे.