नौदलप्रमुख करमबीर सिंग यांनी दिली माहिती : कुठल्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या 3 युद्धनौकांचा वावर असल्याची माहिती भारतीय नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीर सिंग यांनी दिली आहे. नौदल दिनाच्या (4 डिसेंबर) पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत सिंग यांनी नौदलाची तयारी आणि आव्हानांचा उल्लेख केला आहे.
देशासमोर कोविड-19 आणि चीने आव्हान आहे. नौदल या दोन्ही आव्हानांना सामोरे जाण्यास सज्ज आहे. हा प्रकार दोन आघाडय़ांवर लढण्यासारखा आहे. कोविडचा काळ सुरू असून चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु नौदल या दोन्ही आघाडय़ांवर चोख प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे उद्गार सिंग यांनी काढले आहेत. चीनसोबतच्या तणावाच्या स्थितीत सैन्य आणि वायुदलासोबत मिळून नौदल काम करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मेड इन इंडियावर भर
स्कॉर्पियन पाणबुडी चालू महिन्यात नौदलाला प्राप्त होणार आहे. तर रोमियो पाणबुडी पुढील वर्षापासून मिळू लागतील असे नौदलप्रमुख म्हणाले. मेरीटाईम थिएटर कमांडच्या निर्मितीचा विचार सुरू आहे. भविष्यात 43 युद्धनौका आणि पाणबुडी तयार करणार आहोत. यातील 41 भारतातच निर्माण केल्या जातील. यात एक विमानवाहू युद्धनौकाही सामील असल्याचे सिंग यांनी सांगितले आहे. आयएनएस विक्रांतची सागरी चाचणी पुढील वर्षी सुरू होणार आहे. सैन्य आणि वायुदलाची गरज पाहता पी-81 विमाने विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. उत्तर सीमेवर हेरॉन टेहळणी ड्रोन तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
नौदल दिन आज
1971 च्या युद्धात भारतीय नौदलाची महत्त्वाची भूमिका राहिली होती. नौदलाने ट्रायडेंट ऑपरेशन अंतर्गत कराचीच्या बंदराला उद्ध्वस्त केले होते. ही मोहीम 4 डिसेंबरच्या रात्री सुरू करण्यात आली होती. 5 डिसेंबर रोजी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण झाली होती. या धोकादायक मोहिमेत भारतीय नौदलाला कुठलेच नुकसान झाले नव्हते. तेव्हापासून दरवर्षी 4 डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा होतो.