वृत्तसंस्था/ बिजिंग /
येथे सुरू असलेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत जायंट स्लॅलोम या क्रीडाप्रकारात भारताचा एकमेव अल्पाईन स्कायर अरिफ खानला 45 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्हय़ात राहणाऱया 31 वर्षीय अरिफ खानने या क्रीडाप्रकारातील दोन शर्यतीमध्ये संयुक्त दोन मिनिटे, 47.24 सेकंदाचा अवधी घेतला. या क्रीडाप्रकारात तो 45 व्या स्थानावर राहिला. हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी होणाऱया अरिफ खानने पहिल्या शर्यतीत एक मिनिट, 22.32 सेकंदाचा अवधी घेत 53 वे स्थान मिळविले. या क्रीडाप्रकारात एकूण 54 स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला होता. चीनमधील या स्पर्धेवेळी खराब हवामानामुळे या क्रीडाप्रकारात 54 स्पर्धकांना ही शर्यत पूर्ण करता आली नाही. पहिल्या शर्यतीमध्ये 33 स्कायर्सना पूर्ण टप्पा पार करता आला नाही. या क्रीडाप्रकारात 62 देशांचे 89 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या क्रीडाप्रकारातील दुसऱया शर्यतीत अरिफ खानने 1 मिनिट, 24.89 सेकंदाचा अवधी घेतल्याने तो 44 स्थानावर राहिला. दोन्ही शर्यतीच्या निकालानंतर अरिफ खान 45 व्या स्थानावर राहिल्याचे घोषित केले. या क्रीडाप्रकारात स्वित्झर्लंडच्या मार्को ओडेरमॅटने सुवर्णपदक मिळविताना संयुक्त दोन मिनिटे, 09.35 सेकंदाचा अवधी नोंदविला. स्लोव्हेनियाच्या पेनजेकने रौप्य तर फ्रान्सच्या मॅथ्यू फेव्हेरीने कांस्यपदक मिळविले.